आरोग्य विभागाने प्रतिज्ञापत्रातून खोटी माहिती दिल्याचा आरोप 

जागरूक नागरिक स्वतंत्र भूमिकेतून समितीसमोर करणार पोलखोल 
Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2025 15:52 PM
views 237  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयाच्या सुविधांबाबत कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सत्य पडताळणीसाठी नेमलेली समिती उद्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करणार आहे. जिल्हा आरोग्य विभागाने खंडपीठांसमोर ट्राॅमा केअर बाबत प्रतिज्ञापत्रातून दिलेली माहिती धादांत खोटी असून त्याची पडताळणी जागरूक नागरिकांमार्फत आम्ही केली. त्यामुळे उद्या येणाऱ्या समितीसमोर आम्ही आमची स्वतंत्र भूमिका मांडणार असल्याचे डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी शहरातील जागरूक नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट देत आढावा घेतला. 

यावेळी त्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर एवळे, डाॅ.पांडूरग वजराटकर व डाॅ.गिरिश चौगुले आदींसोबत चर्चा केली. अनेक विषयांना हात घालत वस्तुस्थिती जाणून घेतली. 

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड अनिल केसरकर, प्रा.सुभाष गोवेकर, ॲड. नकुल पार्सेकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर,रवी जाधव, रमेश बोंद्रे, प्रसाद पावसकर, पुंडलिक दळवी, निलिमा गावडे, समिर वंजारी, रुपा मुद्राळे, बाब्या म्हापसेकर, प्रतिक बांदेकर,बावतिस फर्नांडिस, याच्यासह अभिनव फाउंडेशनचे अण्णा म्हापसेकर,जितू मोरजकर,तुषार विचारे,अतुल केसरकर, राजू केळुसकर आदी उपस्थित होते.


यावेळी रुग्णालय अधीक्षक डॉ. ऐवळे यांनी रिक्त असलेल्या पदाबाबतची माहिती दिली. रिक्त पदांबाबत वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर केला जातो असेही स्पष्ट केले. याठिकाणी डॉक्टर यायला बघत नाही ही वस्तुस्थिती असून त्या परिस्थितीतही आम्ही उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. रिक्त पदे भरल्यास डॉक्टरांवर येणाऱ्या ताण आणि अन्य गोष्टी आपोआप मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. तर मुळात या ठिकाणी डॉक्टर येत नाही ही केवळ चुकीची माहिती आहे. या ठिकाणी येणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा तसेच वेळेत पगार मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. याला सर्वस्वी जबाबदार शासन आहे असा आरोप डॉ. परुळेकर यांनी केला.

यावेळी उपस्थितानी ट्रामा केअर, आय.सी.यु , ब्लड बँक आदींची पाहणी केली. मात्र आयसीयू साठी आवश्यक असलेले एमडी फिजिशियन सारखे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी नसल्याने आयसीयू असून नसल्यासारखा आहे, ब्लड बँकेमध्येही तीच परिस्थिती आहे, ट्रामा केअर आवश्यक डॉक्टर अपुरे आहे हे समोर आले. मात्र, असे असतानासुद्धा जिल्हा आरोग्य विभागाने कोल्हापूर खंडपीठांसमोर प्रतिज्ञापत्रातून दिलेली माहिती पूर्णपणे चुकीची आहे. अभिनव फाऊंडेशनने उपजिल्हा रुग्णालयाच्या वस्तुस्थितीबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे या सर्व प्रकाराला वाचा फुटली. त्यांनी केलेले हे काम खरोखरच कौतुकास्पद असून उद्या कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार नेमलेली चौकशी समिती उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणीसाठी दाखल होणार आहे. ती आपली पाहणी करणारच आहे. परंतु, आम्ही सुद्धा त्यावेळी उपस्थित राहून आमची भूमिका आणि रुग्णालयाची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत. प्रसंगी वेगळी भूमिका ही आम्ही हाती घेऊ, असे डॉ. परुळेकर यांनी स्पष्ट केले.