
सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजीमहाराज यांचा पुतळा कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली असताना पुतळा उभारण्यासाठी परवानगी देणाऱ्या यंत्रणेचे प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने अगदी गणेशोत्सवाच्या तोंडावर बदली होते हे संशयास्पद आहे. दाल मे कुछ काला कि संपूर्ण डाळच काळी आहे असा प्रश्न सिंधुदुर्गातील जनतेला पडला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीनी माहितीच्या अधिकारात जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्याकडे पुतळा उभारणीच्या संदर्भात काही माहीती मागीतली आहे अजून ती आम्हाला प्राप्त झालेली नाही. दुसरीकडे पुतळ्याच्या बांधकामाचे आणि परिसरातील बांधकामाचे माॅनिटरींग करणारी एजन्सी सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे कार्यकारी अभियंता पुतळा दुर्घटनेनंतर जिल्ह्यातून गायब आहेत. जिल्ह्याबाहेरील कार्यक्रमात हजेरी लावताना दिसत आहेत. यांना पुतळा दुर्घटनेचे सोयरसुतक आहे की नाही. सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता हे अधिकरी कमी आणि पुढारी अधिक असल्याचे भासतात.
राजकीय पुढारी असल्यासारखे सोशल मिडीया तसेच वृत्तपत्रातून आपली प्रसिद्धी करवून घेत असतात. हे जिल्ह्यात आल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागातील कामे संशयास्पद आहेत कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची भावना जनतेत आहे. तरी हे कार्यकारी अभियंता पुतळा दुर्घटनेनंतर कुठे गायब झाले होते ते रजेवर होते की पुतळा दुर्घटनेचे पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात होते याची तसेच हे कार्यकारी अभियंता जिल्ह्यात रूजू झाल्यावर यांच्या अधिकारात जी सार्वजनिक बांधकाम विभागात कामे झाली आहेत त्याची चौकशी करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजीमहाराज ही संपूर्ण जगातील शिवप्रेमींची शान, अस्मिता आणि आस्था आहे अशा महाराजांच्या पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने तातडीने ज्या पद्धतीने चौकशी करायला पाहिजे ती होताना दिसत नाही या पुतळा दुर्घटनेतील आरोपी जयदिप आपटे अजून पोलीसाना सापडत नाही हे गृह खात्याचे अपयश आहे. काहीतरी थातूरमातूर चौकशी केल्याचा आभास निर्माण करून सरकारला हे प्रकरण दाबायचे आहे का? आणि हे असे होत असेल तर शिवप्रेमी जनता हे कधी ही खपवून घेणार नाही आणि आम्हीही महाविकास आघाडीच्या माध्यामातून रस्त्यावर उतरून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा इर्शाद शेख यांनी दिला.