विरोध असलेल्या शक्तिपीठाचा हायवेच्या सर्व्हेला सुरुवात ?

Edited by: विनायक गांवस
Published on: April 16, 2025 16:45 PM
views 310  views

सावंतवाडी : स्थानिक जनतेने कुठल्याही प्रकारची मागणी न करता शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या माथ्यावर मारण्याचा घाट राज्यातील महायुती सरकारने घातलेला आहे. असा जोरदार हल्लाबोल उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. 

ते म्हणाले, त्या दृष्टीने सदर सहापदरी महामार्गाचा सर्व्हे देखील सुरू झालेला आहे. जागोजागी सदर महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी नीस लावण्यात येत आहेत. गेळे, आंबोली, पारपोली, वेर्ले, नेनेवाडी, उडेली, फणसवडे, घारपी, फुकेरी, तांबोळी, डेगवे, बांदा अशा बारा गावांतून हा महामार्ग जाणार आहे. या पैकी बहुतेक गावे ही ईकोसेन्सिटीव्ह जाहीर करावीत असे माननीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

तसेच हा वाईल्ड लाईफ काॅरिडाॅरचा हा अविभाज्य भाग आहे.  शंभर मीटर रूंदीच्या या महामार्गासाठी लाखो वृक्ष तोडले जाणार आहेत. आधीच वृक्षतोड बंदी असताना या पट्ट्यात बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. त्यात या महामार्गासाठी होणारी वृक्षतोड या जैवविविध निसर्गासाठी मृत्यूची घंटा ठरेल यात वाद नाही. सह्याद्री पट्ट्यातील आणि पायथ्याशी असलेल्या या गावांमध्येच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये पिण्याच्या आणि शेती बागायतीच्या पाण्याचे स्त्रोत बंद होऊन मोठीच समस्या भविष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

एवढ्या मोठ्या वृक्षतोडीमुळे आज हत्ती, गवेरेडे, माकडं, सांबरं यांचा जो त्रास शेती बागायती करणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे तो कित्येक पटीने वाढणार ह्यात शंका नाही. हत्ती आणि गवेरेड्यांचे हल्ले होऊन अनेक शेतकऱ्यांचे नाहक बळी देखील पुढील काळात जातील हे निश्चित असून सामान्य जनतेला नको असलेला ८६००० कोटी रूपयांची जनतेच्या पैशाची लूट करून मुठभर मोठे कंत्राटदार आणि सत्ताधारी राजकीय पुढारी यांचे उखळ पांढरे करणारा हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी घातक ठरणार आहे असं मत डॉ. परूळेकर यांनी व्यक्त केले.