
देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील श्री दत्त मंदिर पुर्व विभाग जोगलवाडी येथील श्री दत्त मंदिरात शुक्रवार दिनांक १७/१०/२०२५ रोजी सप्त प्रहरांचा हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. येथील सुमारे १२५ वर्षांपूर्वीपासुनचा गुरुद्वादशी श्री दत्त नाम सप्ताह यंदाचे वर्षी दिनांक१७/१०/२०२५(शुक्रवार) रोजी संपन्न होत आहे.
दत्तभक्ती अनन्यसाधारण भक्तीमध्ये गणण्यात येते, हा श्री दत्त नाम सप्ताह म्हणजे पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे. गण घाडी आणि थळकर घाडी परिवारातील घरभाटाच्या जमिनींमध्ये सुमारे सन -१९३७ पासून हा सप्ताह कार्यक्रम अव्याहातपणे येथे सुरू आहे. देऊळवाडी,जोगवलवाडी, भूतवाडी, बावकरवाडी आणि तांबळवाडी या नारिंग्रे पूर्व विभागात येणाऱ्या वाड्यांचा सप्ताह म्हणून हा दत्त नाम सप्ताह ओळखण्यात येतो. सुमारे सन-१९३९ मध्ये श्री दत्त मूर्तीची स्थापना या मंदिर ठिकाणी घुमटी वजा मंदिरात करण्यात आली. त्याच्या आधी श्री साखरदांडे यांचे बामणाचे आगर, पोवई आगर या ठिकाणी हा सप्ताह मांडव घालून साजरा करण्यात येत असे. या सर्व कार्यक्रमात वरील वाडीतील ग्रामस्थां बरोबरच नारिंग्रे गावातील इतर वाडीतील ग्रामस्थ स्त्री पुरुष लहान मुलं सर्व दत्तभक्तमंडळी कायमच सहभागी होत आहेत. ग्रामस्थांच्या पूर्ण सहभागातून या श्री दत्त नाम सप्ताह ला सर्वांचाच हातभार लागत असतो. अश्विन महिन्यातील रमा एकादशीच्या दिवशी सूर्योदयानंतर हा सप्ताह दत्तमूर्तीवर अभिषेक होऊन सुरू होतो मागील अनेक वर्षांपासून नारिंग्रे पुर्व विभागातीलच अनेक भजनी सेवा करणाऱ्या भजनी बुवा व सहकारी ग्रामस्थांच्या भजन दिंडी सेवेने या सप्ताहाची नामस्मरणाला सुरुवात होते. मात्र मागील सुमारे ४०-४५ वर्षांपासून या दत्त सप्ताह मध्ये नारिंग्रे गावाच्या लगत असलेल्या गावांबरोबरच देवगड तसेच मालवण, कणकवली तालुक्यातील अनेक गावांच्या भजन दिंडी या दत्त सप्ताहामध्ये आपली भजन सेवा श्री दत्त चरणी रुजू करतात व या दत्त नाम सप्ताहामध्ये रंगून जातात. त्यामुळे सप्ताहाच्या रात्री मंदिर परिसर मोठ्या जत्रेच्या रूपातच विद्युत रोषणाईने झगमगत असतो.
श्री दत्त मंदिराचे सर्व कार्यकर्ते येणाऱ्या सर्व भजन दिंडींचे व त्यांच्यासोबत येणाऱ्या ग्रामस्थांचे आदरातिथ्य करीत असतात मंदिर परिसरामध्ये वाहन व्यवस्था तसेच अन्य व्यवस्थांमध्ये कार्यकर्ते कायम सहभागी असतात एकादशीच्या सूर्योदयानंतर उभा राहिलेला हा सप्ताह द्वादशीच्या सूर्योदया बरोबर संपन्न होतो अखंड दत्त भक्ती मध्ये सर्वजण तलीन झालेले असतात त्यानंतर चक्राकार पद्धतीने एकेका वाडीवरती दिलेल्या जबाबदारीनुसार दत्तभिक्षा घेण्यासाठी रात्री झालेल्या जागरणाचा कुठेही लवलेश न बाळगता दत्त भगवंताच्या महाप्रसादासाठी कार्यकर्ते तत्परतेने सहभागी होतात. दुपारी सर्व ग्रामस्थांना महाप्रसाद देण्यात येतो, गावातील ब्राह्मण वृंद श्री दत्ताची पूजा झाल्यानंतर महाप्रसादाचा नैवेद्य दाखवतात येणाऱ्या सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते आणि त्यानंतर हा सर्व श्री दत्त नाम सप्ताह चा कार्यक्रम संपन्न होतो.