
देवगड : शारीरिक व मानसिक त्रास दिल्या प्रकरणी देवगड सातपायरी येथील तीन संशयितांना देवगड न्यायालयाने ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. देवगड सातपायरी येथील साक्षी सागर अनभवणे, वय २८ या विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेला तिचा पती सागर रामदास अनभवणे, वय ३२, सासरे रामदास अनंत अनभवणे, वय ६१, सासू रोहिणी रामदास अनभवणे, वय ६२ या तीनही संशयितांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी देवगड न्यायालयासमोर हजर केले. तीनही संशयितांना देवगड न्यायालयाने ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार तोळे सोने व मोटरसायकलच्या मागणीसाठी विवाहिता सौ. साक्षी हिला तिचा पती सागर, सासरे रामदास अनभवणे, सासू रोहिणी अनभवणे हे संशयित शारिरीक व मानसिक त्रास देत होते. तसेच पीडित विवाहिता ही अडिज महिन्यांची गरोदर असताना तिच्या संमत्तीशिवाय पती सागर याने तिचा एका खासगी रुग्णालयात गर्भपात केला होता.
याबाबतची फिर्याद विवाहिता साक्षी अनभवणे हिने देवगड पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संशयित पती, सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व तात्काळ अटक करण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी देवगड न्यायालयाने तीनही संशयितांना ३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगाडे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.