
वैभववाडी : सबका साथ सबका विकास या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रीदवाक्याला आमदार नितेश राणे यांनी तिलांजली दिली. गब्बरसिंगला लाजवतील, असे डायलॉग धमकवण्यासाठी रोज नव्याने ते मारत आहेत. ५० लाखाचे इनाम लावुन, सुध्दा बर्याच ग्रामपंचायती हाताला लागणार नाहीत, याचा अंदाज आल्याने, त्यांनी त्याच अंदाजाने, नांदगांवच्या मतदारांना धमकावले आहे. हे एका लोकप्रतिनिधीला शोभनीय नाही. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संदीप सरवणकर यांनी केली आहे.
सरवणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नांदगाव येथील एका भाषणात आ. राणे थेट मतदारांना धमकी देत आहेत. जे गाव मला पसंतीचा सरपंच देणार नाही, त्यांचा मी विकास करणारच नाही. मुख्यमंत्री,कलेक्टर व पालकमंत्री हे मला विचारुन निधी देतात.मी असा गावाला निधीच देणार नाही. मी राणे साहेबांच्या तालमीत हे शिकलो आहे."असा डायलाँग मारुन मतदारांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जिल्हयात मात्र त्यांचे हसे होत आहे. देशाचे पंतप्रधान मोदी " सबका साथ सबका विकास" हे ब्रिद वाक्य आता त्यांचेच गादी चालवणारे खुंटीला लावुन ठेवत आहेत. काटावर सरकार चालवताना, त्यांना असे बेताल लोकांच्या तालावर नाचावेच लागत असणार, असे मत श्री. सरवणकर यांनी व्यक्त केले आहे.