
सावंतवाडी : तालुक्यासह शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण भागासह शहरात ठिकठिकाणी हनुमान जयंतीचा मोठा उत्सव पहायला मिळाला. शहरातील सालईवाडा येथील हनुमान प्रसादिक कला, क्रीडा मंडळाच्यावतीन हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यानिमित्त शहरात श्रीराम व हनुमान मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री हनुमानाची साकारलेली वेशभूषा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरातील सर्व हनुमान मंदिरात ही मिरवणूक पोहचली. सकाळपासूनच मंदिरात भाविकांची वर्दळ होती. पुरोहितांच्या मंत्रघोषात विविध धार्मिक विधी पार पडले.
शहरातून श्रीराम व हनुमान मूर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. सालईवाडा जुनी पंचायत समिती, साई वात्सल्य मंदिर, पिंपळेश्वर मारूती, दक्षिणाभिमुख मारूती, जुना बाजार मारूती, अश्वत्थ मारूती, नरेंद्र डोंगर मारूती, माठेवाडा, वैश्यवाडा, भटवाडी, खासकीलवाडा, कोर्टाजवळील मारूती मंदीर आदी ठिकठिकाणी मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली. तसेच कोलगाव, कारिवडे आदी गावांसह तालुक्यात ठिकठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली.