हळबे महाविद्यालयात पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचं व्याख्यान

अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त
Edited by: संदीप देसाई
Published on: July 02, 2024 06:53 AM
views 70  views

दोडामार्ग : दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पोलीस ठाणे दोडामार्ग यांच्यावतीने अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून अंमली पदार्थ सेवनाची कारणे दुष्परिणाम व त्यावर शासनाची व स्वयंसेवी संस्थांची शाळा महाविद्यालयांची भूमिका यावर दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांचे व्याख्यान संपन्न झाले. 

आपल्या व्याख्यानात विविध अंमली पदार्थांची माहिती सांगून ती सेवन केल्यास जवळ बाळगल्यास विक्री केल्यास कोणती शिक्षा आहे. याची सविस्तर माहिती महाविद्यालयातील तरुणांना दिली. तरुणांनी चांगला अभ्यास करून चांगला व्यवसाय किंवा नोकरी करावी  कोणत्याही व्यसनाला बळी पडू नये. शिक्षण घेत असताना वाईट मित्रांच्या संगतीने व्यसन लागू शकते. त्यापासून दूर राहा शिका मोठे व्हा व देशाचे नाव उज्वल करा असे सांगितले. त्यांनी व्यसनमुक्ती वर कविता सादर करून कवितेतून जागृती करण्याचा प्रयत्न केला तसेच भारताच्या नवीन कायद्याविषयी माहिती दिली. 

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सोपान जाधव, कसई दोडामार्गचे नगरसेवक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉक्टर संजय खडपकर, पोलीस निरीक्षक श्री निसर्ग ओतारी, पोलीस कॉन्स्टेबल तथा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समीर सुतार, कॉन्स्टेबल  विजय जाधव प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर संजय खडपकर तर आभार कुमारी साक्षी रामचंद्र गवस हिने केले.