हळबे महाविद्यालयाला NAAC चे बी++ मानांकन

Edited by: संदीप देसाई
Published on: January 04, 2024 19:21 PM
views 80  views

दोडामार्ग : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई सीताराम हळबे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती मंडळ (NAAC), बेंगलोरच्या त्रिसदस्यीय समितीकडून महाविद्यालयास बी ++ (CGPA-2.95) हे मानांकन मिळविले आहे.  14 आणि 15 डिसेंबरला त्रिसदस्यीय समितीने या महाविद्यालयात राबविण्यात आलेला अभ्यासक्रम , अभ्यासक्रमपूरक, आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे मूल्यांकन केले होते. याचा निकाल नुकताच जाहीर झाला असून महाविद्यालयास बी ++ (CGPA-2.95) हे मानांकन मिळाल्याची माहिती प्राचार्य सुभाष सावंत यांनी दिली आहे.

     या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष निर्वाण विद्यापीठ, जयपूर चे कुलगुरू प्रो. अरविंद कुमार अग्रवाल, समन्वयक, महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदराच्या पुरातत्त्व विभागाचे अधिष्ठाता प्रो. कृष्णन कृष्णन तर सदस्य, तामिळनाडू येथील साराह टकर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ. जासमिन मथिएलगण हे होते.

तत्पूर्वी ऑगस्ट 2023 मध्ये महाविद्यालयाने स्वयं अध्ययन अहवाल (एस एस आर) naac ला जमा केला होता. यामध्ये   परिमाणात्मक (quantitative) मेट्रिक चे मूल्यांकन पूर्वीच झाले होते, तर उर्वरित गुणात्मक (qualitative) मेट्रिकच्या तपासणीसाठी त्रिसदस्यीय समितीने महाविद्यालयास भेट दिली. समितीने शैक्षणिक वर्ष 2017-18 ते 2021-22 दरम्यान झालेल्या विविध उपक्रमांची, आणि उपलब्ध भौतिक व तांत्रिक सुविधांची सखोल तपासणी केली. तसेच संस्था व महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी, मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक यांच्याशी महाविद्यालयाची वाटचाल आणि भविष्यातील योजना यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद साधून महाविद्यालयाच्या कामगिरीविषयी त्यांचे अभिप्राय जाणून घेतले.


दोडामार्गसारख्या दुर्गम भागातील तरुणांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाविद्यालय करत असल्याचे गौरवोद्गार समितीने काढले. यावेळी विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवा विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे, विविध लघू मुदतीचे अभ्यासक्रम चालविणे, तसेच इतर महाविद्यालयाशी व संस्थांशी केलेले सामंजस्य करार याबाबत समितीने कौतुक केल्याचेही महाविद्यालयाकडून  सांगण्यात आले आहे.


महाविद्यालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, माजी अध्यक्ष श्रीपाद हळबे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य विवेकानंद नाईक, राजेंद्र केरकर, डॉ हेमंत पेडणेकर तसेच सूर्यकांत परमेकर यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, आय.क्यू.ए. सी. चे समन्वयक रामकिसन मोरे, सहाय्यक समन्वयक डॉ. सोपान जाधव, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.