‘ज्ञानवापी’ मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी

वाराणसी कोर्टाचा मोठा निर्णय
Edited by: ब्युरो
Published on: January 31, 2024 10:52 AM
views 116  views

वाराणसी : वाराणसी जिल्हा न्यायालयाने हिंदूंच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी हिंदू पक्षाला देण्यात आली आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 7 दिवसांच्या आत कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.

वाराणसी जिल्हा न्यायालयात काशी ज्ञानवापीशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. या मालिकेत आज म्हणजेच बुधवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी कॅम्पसशी संलग्न सोमनाथ व्यासजींच्या तळघरात हिंदूंना नियमित पूजा करण्याबाबत मोठा निर्णय दिला. तेथे 7 दिवसांत पूजा करण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर आता व्यासजींच्या तळघरात काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे नियमित पूजा करण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने हा मोठा विजय असल्याचे म्हटले असून 30 वर्षांनंतर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. नोव्हेंबर 1993 पर्यंत येथे पूजा केली जात होती.

वाराणसीच्या ज्ञानवापी कॅम्पसमध्ये असलेल्या व्यास तळघरामध्ये पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करणाऱ्या शैलेंद्र कुमार पाठक यांच्या याचिकेवर काल (दि. 30) मंगळवारी सुनावणी झाली होती. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांनी आदेश राखून ठेवला होता. ज्यावर आज (दि. 31) निर्णय देण्यात आला आहे.