ज्ञानदीपची शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद : पुष्कराज कोले

'कोकणसाद LIVE' चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांना 'आदर्श ज्ञानदीप पत्रकार पुरस्कार' प्रदान
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: December 26, 2022 12:25 PM
views 230  views

सावंतवाडी : ज्ञानदीप हे इतरांना प्रेरणा देणारे मंडळ आहे. कला-गुणांचे कौतुक करणारे, दिशादर्शक, सामाजिक भान जपण्यासाठी कार्यरत आहे. सलग सोळा वर्षे संस्था विविध उपक्रम राबवून प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. हे जिल्हावासियांना अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. राज्यात नव्हे तर देशात शैक्षणिक क्षेत्रात आपले विद्यार्थी चमकले पाहिजेत, असे मौलिक विचार ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळ्यात दानशूर व्यक्तिमत्व आणि यशस्वी उद्योजक पुष्कराज कोले यांनी श्रीराम वाचन मंदिरात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करण्यात आले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक  यांनी केले. गेल्या सोळा वर्षात राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक. सांस्कृतिक अशा उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

समृद्धी  सावंत, केतकी सावंत यांनी ईशस्तवन, स्वागत गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगपती पुष्कराज कोले, संस्थापक अध्यक्ष वाय. पी. नाईक, साहित्यिका उषा परब, अध्यक्ष जावेद शेख, खजिनदार एस.आर.मांगले यांच्या हस्ते सन २०२१, २०२२चे पुरस्कार प्रदान करण्यात आले. गौरवपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ,  फेटा बांधून पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले.



हे ठरले 'ज्ञानदीप'

पुरस्कार विजेते  सागर चव्हाण (मुख्य संपादक कोकणसाद LIVE व कोकणसाद), ज्येष्ठ माजी सैनिक शिवराम जोशी (माजी सैनिक), बाळू कांडरकर (संगीत), अनुष्का नागेश कदम (उपक्रमशील शिक्षिका), शामल मांजरेकर (कवयित्री), प्रा. एस. एन. पाटील (सामाजिक, शैक्षणिक), हेमा नाईक (अंगणवाडी सेविका), सूर्यकांत सांगेलकर (शैक्षणिक सेवा), सुनील नाईक या पुरस्कार विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी सौ. रेखा भुरे (संचालिका, महिला पतसंस्था, सावंतवाडी), मिलिंद गुरव (सिनेअभिनेता), कु. जयदीप खोडके (शौर्य  सन्मान), डॉ. मिलिंडा परेरा (दिल्ली सरकारी  आयुर्वेदिक काॅलेज), तेजस्विनी कांबळे (सुवर्णपदक मराठी विषय बी.ए., बेळगाव) यांनाही सन्मानित करण्यात आले.


ज्ञानदीपने तीन पिढींचा केला सन्मान !

ज्ञानदीप पुरस्काराच्या सत्कारमूर्तींमध्ये युवा संपादक सागर चव्हाण, सर्वात ज्येष्ठ व्यक्ती व माजी सैनिक शिवराम गणेश जोशी आणि शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात अग्रेसर असलेले विविध मान्यवर तसेच विशेष सन्मानार्थीमध्ये कु. जयदीप खोडके,  तेजस्विनी कांबळे आदींचा सत्कार करीत ज्ञानदीपने तीन पिढींचा सन्मान केल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही ज्ञानदीप शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे तोंडभरून कौतुक केले .

यावेळी उषा परब, प्रा. नागेश कदम, शामल मांजरेकर, शिवराम जोशी, सूर्यकांत सांगेलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

व्यासपीठावर मंत्री दीपक केसरकर, पुष्कराज कोले, उषा परब, वाय. पी. नाईक, जावेद शेख, एस. आर. मांगले, रेश्मा भाईडकर, प्रा. रुपेश पाटील, विनायक गावस आदि उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. एन. बी. कारवेकर, विलास कासकर, सलीम तकीलदार, सुनील नेवगी,   अॅड. मनोहर मोरे, रमेश काकतकर, राजू मुतकेकर, एस. व्ही. भुरे, पृथ्वी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. रूपेश पाटील, आभार कार्याध्यक्ष निलेश पारकर यांनी मानले.