
चिपळूण : तालुक्यातील पेढे येथील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित आर. सी. काळे माध्यमिक विद्यालय पेढे परशुरामच्या आठवीत शिकणाऱ्या गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून नजीकच्या श्री परशुराम निसर्ग सान्निध्य पर्यटन केंद्र’ला भेट देऊन जागतिक वनदिनाचे महत्त्व आणि जंगली व इतर वनस्पतींची ओळख करून घेतली. घरडा केमिकल्स मार्फत शाळेत सुरू असलेल्या 'ओरिअर्थ नेचर फाउंडेशन' उपक्रमांतर्गत ही भेट घेण्यात आली.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या विलास महाडिक यांनी विद्यार्थ्यांना, केंद्रातील वनस्पतींची नावे व त्यांचे महत्त्व सांगितले. विविध पक्षी आणि त्यांची घरटी, छोटी जल परिसंस्था दाखवली. विविध निसर्गचित्रे दाखवली. विद्यार्थ्यांना वनस्पतीच्या स्थानिक प्रजाती जसे - बेल, आवळा, काळीमिरी,तुळस, पपई, औदुंबर, पेरू, चिकू आणि शोभेसाठी असणाऱ्या काही वनस्पती पहावयास मिळाल्या.
वनांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध, जंगलावर अवलंबून असणारी जैवविविधता याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१२ पासून २१ मार्च हा दिवस जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवल्याचे पर्यावरणप्रेमी लेखक धीरज वाटेकर यांनी सांगितले. वाटेकर यांनी पुढे बोलताना, पेढे परिसरातील पक्षीवैभव, जंगल आणि वनशेती ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून समजावून सांगितली. जंगल कोण वाढवतो? याबाबत माहिती देताना त्यांनी हॉर्नबिल पक्ष्याविषयी सांगितले. निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर निसर्ग आपल्याशी संवाद साधू लागतो म्हणून आपण निसर्गाशी कनेक्ट होण्याची गरज आहे. नारळाचे झाड आणि कोकमाचे झाड जवळ लावल्यास ते एकमेकांशी करीत असलेल्या निकोप स्पर्धेविषयी सांगून सर्वोत्तम गुणवत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न निसर्गाकडून झाडांकडून आपण शिकून घ्यायला हवा असे वाटेकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव व जागृती निर्माण व्हावी व त्यातून निसर्गाचे संवर्धन व्हावे यासाठी शाळेचे मुख्याध्यापक विनायक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित केल्याचे शिक्षिका माळी यांनी सांगितले. विद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षिका सौ. भुरण, प्रयोगशाळा सहाय्यक संदीप थत्ते सर उपस्थित होते. शाळेतर्फे पर्यटन केंद्र संचालिका सौ नूतन आणि श्री विलास महाडिक तसेच लेखक धीरज वाटेकर यांना पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.