
चिपळूण : कलाक्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या संस्कार भारती उत्तर रत्नागिरी समितीतर्फे यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त "गुरुवंदना" कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, बेडेकर सभागृह, ब्राह्मण सहाय्यक संघ, विरेश्वर कॉलनी, चिपळूण येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे यंदाही एका गुरुतुल्य व्यक्तिमत्त्वाचा सन्मान केला जाणार आहे. यावर्षी चिपळूणच्या सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती स्मिता देवधर यांना "गुरुवंदना सन्मान" प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेचे अठरा अध्याय मुखोद्गत करणाऱ्या सौ. मेधा जोशी यांचाही विशेष सन्मान होणार आहे. त्यांना याआधी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य यांचेकडूनही गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक दीपक काटदरे यांच्या चैतन्य ग्रुप, चिपळूण प्रस्तुत गीत रामायण गायन ही संगीतमय मैफल रसिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. गीत रामायणाच्या भक्तिरसपूर्ण सादरीकरणातून श्रोत्यांना अध्यात्मिक आणि सांगीतिक आनंद मिळणार आहे.
कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी संस्कार भारती उत्तर रत्नागिरी समितीचे सर्व कार्यकर्ते मेहनत घेत आहेत. या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवून कलावंतांचा गौरव व या सांस्कृतिक उपक्रमाला बळ द्यावे, असे आवाहन महामंत्री मंगेश बापट (मो. ९४२२००३४२२) आणि संगीत विधा प्रमुख सौ. मेघना गोखले (मो. ९४२२६३५१११) यांनी केले आहे.