
चिपळूण : येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागातर्फे गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते श्री. मंदार ओक यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अविनाश पालशेतकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. माधव बापट यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे श्री. मंदार ओक यांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या प्रभावी व्याख्यानात मंदार ओक यांनी स्वामी परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्यातील गुरू-शिष्य नात्याचे विविध पैलू कथांद्वारे उलगडून सांगितले. "भारताची गुरू-शिष्य परंपरा ही केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित नसून, ती चरित्र निर्माणाची प्रक्रिया आहे," असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवृत्ती व मूल्याधिष्ठित जीवनाचे बीज पेरले.
“राष्ट्रीय सेवा योजनेचे खरे उद्दिष्ट म्हणजे 'सेवाव्रत' — आणि गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आत्मशुद्धीचा, आत्मविकासाचा संकल्प करावा,” असे ते म्हणाले.
प्राचार्य डाॅ. माधव बापट यांनी आपल्या भाषणात गुरू-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करून विद्यार्थ्यांना उत्तम संस्कारांची शिकवण दिली. कार्यक्रमाला प्रा. सौ. कुलकर्णी मॅडम, प्रा. निपाणे सर, प्रा. ढेरे सर, सौ. दाभोळकर मॅडम यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. सोनाली खर्चे यांनी केले. गुरूपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना ज्ञान, सेवा आणि मूल्ये यांचे महत्त्व पटवून देणारा हा कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला.