सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

Edited by: दिपेश परब
Published on: January 15, 2024 08:46 AM
views 151  views

वेंगुर्ला : सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत बचत गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी १३ जानेवारी रोजी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये मेळावा आयोजित केला होता. याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या मेळाव्यात महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच त्यांची आर्थिक उन्नत्ती व्हावी या उद्देशाने सिधुरत्न समृद्धी योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदानीत कर्ज प्रस्तावावर सिधुरत्न समृद्ध योजनेचे प्रकल्प व्यवस्थापक आनंद तेंडुलकर यांनी महिला बचत गटांना प्रस्तावनिहाय सविस्तर मार्गदर्शन केले. यात काजू प्रक्रिया युनिट, मसाला व्यवसाय, पापड उद्योग, पीठ उद्योग, खाद्यपदार्थ अशा अनेक व्यवसायांसाठी आवश्यक असणारी मशिनरी व आवश्यक कागदपत्रांची माहिती व त्यातून उत्पादीत मालाची विक्री कशाप्रकारे करावयाची याबाबतही माहिती दिली.

जिल्हा नियोजनचे निमंत्रित सदस्य सचिन वालावलकर यांनी सिधुरत्न समृद्ध योजनेबद्दल विस्तृतपणे मार्गदर्शन केले. DAY-NULM अंतर्गत स्थापित महिला बचत गटांना सर्व बँकांच्या माध्यमातून कर्ज सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी बँक व्यवस्थापकांशी समन्वय ठेवण्यात येईल. उत्पादित मालांना विक्रीसाठी एकसंघ स्टॉल उपलब्ध करून दिले जातील असे प्रतिपादन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले.