निरवडेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Edited by: विनायक गांवस
Published on: July 06, 2024 07:48 AM
views 128  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघ नेहमीच सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हित जोपसण्याचा प्रयत्न करत आहे. निरवडे येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी ई पिक नोंदणी, एका रूपयात विमा मार्गदर्शन मेळाव्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल. खरेदी-विक्री संघाचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी आज व्यक्त केले.

सावंतवाडी खरेदी विक्री संघ, महसूल विभाग सावंतवाडी व ग्रामपंचायत निरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने ई पिक नोंदणी,शेतकरी पीक विमा व कृषी मार्गदर्शन मेळावा निरवडे ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब,खरेदी-विक्री संघाचे प्रमोद गावडे, निरवडे सरपंच सौ सुहानी गावडे,खरेदी विक्री संघ संचालक प्रमोद सावंत, गुरूनाथ पेडणेकर, अभिमन्यू लोंढे,विनायक राऊळ, आत्माराम गावडे,भाऊ कोळंबेकर,उपसरपंच अर्जुन पेडणेकर, कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी गावडे, आदेश जाधव, आनंदी पवार, माजी सरपंच सदा गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष महेंद्र गावडे, माजी उपसरपंच चंद्रकांत गावडे , संघाचे व्यवस्थापक महेश परब,तलाठी नमिता कुडतडकर, आनंद पांढरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.          

यावेळी बोलताना श्री.पाटील पुढे म्हणाले, केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सुरू आहे त्यामुळे ज्यांनी हे कार्ड काढले नसेल त्यांनी त्वरित हे कार्ड काढून घ्यावेत आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायत च्या वतीने शिबिर आयोजित करून गावातील सर्वांचे आयुष्यमान भारत हे कार्ड काढून घ्यावे या योजनेमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये उपचार मोफत होत आहेत तर यापूर्वी खाजगी रुग्णालयामध्ये पाच लाखापर्यंतचे उपचार हे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळत होता मात्र आता त्यामध्ये बदल करून पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना सुद्धा समावेश केले आहे त्यामुळे सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या असे आवाहन त्यांनी केले. श्री पाटील पुढे म्हणाले, पिक विम्याची मुदत ही १५ जुलै पर्यंत आहे. शेतकऱ्यांना त्याचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांच्या भाताला खाजगी व्यापारी चांगले भाव देत नाहीत .त्याच्या तुलनेत शासन हमीभाव देत आहे. त्यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी भात न विक्री करता सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाकडे भात विक्री करावे जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा आणि शासनाचे विविध असलेले लाभ मिळू शकतात. या ठिकाणी शेतकरी पीक कर्ज सुद्धा घेऊ शकतात. हे कर्ज घेतल्यानंतर आपण आपल्या जमिनी लागवड करू शकतो बऱ्याच वेळा शासनाकडून कर्जमाफी सुद्धा शेतकऱ्यांसाठी केली जाते याचा फायदा शेतकऱ्यांना होतो नैसर्गिक आपत्ती किंवा वादळे आली तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते त्यासाठी सातबाराला नोंद असणे आवश्यक आहे त्यामुळे सर्वांनी ई पिक नोंदणी आणि फळपीक विमा नोंदणी करून घ्यावी तर सरकारची कोणतीही योजना किंवा स्पर्धात निरवडे ग्रामपंचायत कायमच अग्रेसर आहे त्यामुळे शंभर टक्के ई पिक पाहणी करण्याचा संकल्प निरवडे गावापासून करू असे त्यांनी सांगितले. यावेळी सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे म्हणाले, ई पिक नोंदणी आणि शासनाच्या विविध कृषी विषयक योजनांचे जनजागृती करण्यासाठी व त्या योजनांच फायदा शेतकऱ्यांनी मिळावा या हेतूने आज या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला आहे. पुढील काळात सावंतवाडी तालुक्यात अशा प्रकारचे मेळावे आयोजित करून जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे.  सावंतवाडी खरेदी विक्री संघ हा शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा. यावर्षी सावंतवाडी खरेदी-विक्री संघाकडून भात घातलेल्या सुमारे अकराशे शेतकऱ्यांना बोनस मिळाला आहे तर संघाच्या वतीने अकराशे मॅट्रिक टन च्या वर खत विक्री करण्यात आले आहे. संघाची ज्या ठिकाणी दुकाने आहेत. त्या ठिकाणी खत उपलब्ध करून दिले जात आहे त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा या ठिकाणी शेती क्षेत्र मोठ्या संख्येने कमी होत हे खेदजनक आहे मात्र हे क्षेत्र वाढले गेले पाहिजे यासाठीच हा मेळावा आयोजित केला आहे.

यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब म्हणाले, शासनाच्या माध्यमातून विविध योजना शेतकऱ्यांसाठी सुरू आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे या ठिकाणी कृषी अधिकारी शेतकऱ्यांना योजनांची माहिती व त्यासाठी लागणारे सहकार्य करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या माध्यमातून आपली प्रगती करावी असे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुहानी गावडे, माजी सभापती प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना ईपीक संदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल धर्माजी गावडे यांचा तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषद शाळा निरवडे नंबर १ या शाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले त्यामुळे समीक्षा शशिकांत गावडे व तनवी शिवाजी गावडे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास गावडे तर आभार महेश परब यांनी केले.