महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन !

Edited by: विनायक गावस
Published on: October 05, 2023 17:55 PM
views 47  views

सावंतवाडी : गोगटे -वाळके महाविद्यालयात गोगटे -वाळके महाविद्यालय बांदा आणि श्रीमती चंद्राबाई कल्लाप्पा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, हलकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विकास कक्षा अंतर्गत" महिलांचे आरोग्य"हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने प्रमुख वक्त्या सौ वर्षा माळी (ब्युटीशियन कोल्हापूर) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि त्यांचे आरोग्य व सौंदर्य विषयक समस्या यावर विद्यार्थिनींशी संवाद साधत प्रदीर्घ चर्चा केली. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून वर्षा माळी यांनी केसांचे आरोग्य आणि एकूणच संपूर्ण शरीराची कशी काळजी घ्यावी यासंदर्भात सखोल माहिती दिली. 

जाहिरातींना बळी पडून घातक सौंदर्यप्रसाधनांच्या आहारी जाऊ नये याबद्दलही सतर्क केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी. जी. काजरेकर हे होते."स्त्रियांचे आरोग्य ही सुखी कुटुंबाची गुरुकिल्ली आहे, आरोग्य चांगले असल्यास कार्यक्षमता वाढते, विशेषतः महाविद्यालयीन मुलींनी आपले आरोग्य जपल्यास त्याचा परिणाम त्यांच्या सर्वांगीण विकासावरही होईल, बदलत्या जीवनशैलीत आरोग्याबरोबरच सौंदर्य विषयक जाणीवही महत्त्वाचा विषय ठरत असल्याने निकृष्ट जीवनशैलीला बगल देत काळाबरोबर चालण्याचा प्रयत्न करावा,"असा संदेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. काजरेकर यांनी दिला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. रश्मी काजरेकर यांनी केले तर प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रा.अनिल शिर्के यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षवर्धिनी जाधव यांनी केले आणि आभार  विद्यार्थिनी कु. राणी कांबळे हिने व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. किशोर म्हेत्री, महाविद्यालयीन विद्यार्थिनी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .