
देवगड : श्रीम.एन.एस.पंतवालावलकर कनिष्ठ महाविदयालय देवगडच्या वतीने कुणकेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सात दिवसांचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्कार शिबिराच्या अनुषंगाने सहभागी विदयार्थ्यांमध्ये विशेष संस्कार रूजविण्या करीता वेगवेगळे विषय आणि उपक्रम ठेवण्यात आले आहेत. विदयार्थ्यांमधे सामाजिक जाणीव निर्माण करण्याकरीता शासनाच्या विविध सामाजिक योजनांची माहिती देण्याकरीता देवगड तहसिल मधले शासकिय सेवक प्रदिप कदम यांचे विशेष असे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शासकिय योजना ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याच्या उध्देशाने प्रदिप कदम यांनी राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिरातील सहभागी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विशेष अर्थ सहाय्य योजना, आवास योजना, आरोग्य योजना, कृषी विषय योजना, महिला व बालविकास योजना, रोजगार व स्वयंरोजगार योजना, कामगार योजना, परिवहन योजना, अन्न व नागरी पुरवठा योजना तसेच विविध महामंडळाच्या योजना या विषयी सविस्तर माहिती दिली. या योजना शासनाच्या ग्रामपंचायत ते तहसिल पातळीवर कोणकोणत्या विभागाव्दारे राबविल्या जातात याबाबतही मार्गदर्शन केले.
शासकिय योजनांच्या लाभासाठी एकादा पात्र नसला तरी जो कोणी लाभार्थी पात्र असेल अशा लोकांपर्यंत माहिती पोहचविण्याची आपली प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रदिप कदम यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर तेली, प्रा.स्नेहल जोईल, प्रा. शिरगांवकर, प्रा.प्रभाकर वाघ, श्रीम.हिर्लेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिबिरार्थी श्रृती जोईल हीने केले.










