
देवगड : मुलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्यक आहे. बाल अत्याचाराची कोणतीही घटना आढळल्यास ‘1098’ या बालसहाय्यता क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे प्रतिपादन कायदेविषयक जनजागृती शिबिर कार्यक्रमात देवगड तालुका विधी समितीच्या विधिज्ञा अपर्णा परांजपे यांनी जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे उच्च माध्यमिक (व्यव.) विभागाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. याप्रसंगी विचारमंचावर तालुका विधी समितीचे विधिज्ञ अभिषेक गोगटे, विधीज्ञ गिरीश भिडे, प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, एस.आर.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
बालकांच्या लैंगिक शोषण, छळ आणि अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने 2012 साली “Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act” हा कायदा लागू केला आहे. या कायद्याचा उद्देश १८ वर्षांखालील मुलांना सर्व प्रकारच्या लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण देणे हा आहे. या कायद्यांतर्गत लैंगिक छळ, अश्लील प्रदर्शन, बलात्कार, तसेच बाल अश्लील चित्रफितीचा वापर यासारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा व दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मुलांच्या साक्षी घेताना त्यांच्या भावनिक स्थितीचा विचार करून, विशेष प्रशिक्षित अधिकारी आणि विशेष न्यायालये यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कायद्यामुळे अनेक बालकांना न्याय मिळाला असून, समाजात बालसुरक्षेबाबत जागरूकता निर्माण होत आहे. POCSO कायद्याची प्रभावी अंमलबजावणी ही सुरक्षित बालपणाकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.असे श्रीमती.अपर्णा परांजपे यांनी सांगितले.
"राष्ट्रीय शिक्षण दिन” या विषयावर बोलताना विधिज्ञ गिरीश भिडे म्हणाले की, भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.
मौलाना आझाद यांनी शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध व्हावे, यासाठी आयआयटी, युजीसी यांसारख्या संस्थांची स्थापना केली. त्यांच्या कार्यातून आजचा भारत शिक्षण क्षेत्रात प्रगतीचा मार्ग चालू शकला आहे.या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आदरभाव, जबाबदारी आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून सर्वांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज विकासात आपला वाटा उचलण्याचे आवाहन ही गिरीश भिडे यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक सुनील जाधव यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार एस.आर.जाधव यांनी केले.











