मणचेत आत्मा अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकरी गटासाठी मार्गदर्शन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 15, 2023 16:07 PM
views 80  views

देवगड :  मणचे येथे आत्मा अंतर्गत नोंदणी केलेल्या नवांकुर शेतकरी गट, मणचे व तालुका कृषी अधिकारी कार्यालय देवगड यांच्या वतीने शेतकरी गटासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कैलास. ढेपे आत्मा यंत्रणेचे . निकेतन राणे, उपसरपंच मन्सूर सोलकर, ग्रा. पं सदस्या श्रीम.रहाटे, तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुनाथ घाडी, गटाचे अध्यक्ष प्रकाश रहाटे उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य व शेतकरी उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर गटाचे नाव व गटाचा लोगो असलेल्या फलकाचे कैलास ढेपे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. शेतकरी गटाचे सचिव अजित कानेटकर यांनी प्रास्ताविक करताना शेतकरी गटाची संकल्पना,स्थापनेचा उद्देश इ बाबत माहिती दिली. आत्मा अंतर्गत शेतकरी गटाच्या नोंदणीची प्रक्रिया, नैसर्गिक शेती योजना ई. बाबत श्री निकेतन राणे यांनी मार्गदर्शन केले. तर श्री. ढेपे साहेब यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, शेतकरी गटामार्फत राबविता येतील असे विविध प्रकल्प आणि नैसर्गिक शेती योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन करून गटाच्या पुढील यशस्वी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.यावेळी  राजेंद्र काडगे यांचे देखील सेंद्रिय शेती उत्पादन आणि बाजारपेठ या विषयी विशेष मार्गदर्शन लाभले. उपसरपंच मन्सूर सोलकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.