कोकण विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचं पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Edited by: दिपेश परब
Published on: February 13, 2025 16:42 PM
views 239  views

वेंगुर्ले : मी पालकमंत्री म्ह्णून एक प्रशासनाचा भाग आहे . तुमच्याकडून जनतेच्या हिताची विविध काम करून घेत असताना तुमची काळजी घेणे ही आमची प्राथमिकता आहे. या स्पर्धांप्रमाणेच पुढील काळात आपण मेडिटेशन कॅम्प, आर्ट ऑफ लिव्हिंग चे कोर्स घ्यावेत यातून मानसिक शांतता मिळण्यास मदत होऊ शकते. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने अशा स्पर्धा पुढील काळात घेत असताना वॉटर स्पोर्ट्सचा पण त्यात समावेश करा. आपल्यामध्ये असलेली जिद्द, चिकाटीपणा, आत्मविश्वास, खिळाडूवृत्ती, निर्णय घेण्याची क्षमता या सर्वांना वाव देण्यासाठी या स्पर्धांचा आपल्याला फायदा होईल.  त्या त्या क्षणाला तो योग्य पद्धतीने निर्णय घेतला तर आपण ही स्पर्धा जिंकू शकतो हा भाग आपल्या प्रशासकीय यंत्रणेत आणावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे महसूल व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले. 

वेंगुर्ले शहरातील मेजर ध्यानचंद क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते. सर्वप्रथम मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व क्रीडा ज्योत पेटवून तसेच क्रीडा फलक फडकवून या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महसूल विभागीय आयुक्त डॉ राजेश देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी  अनिल पाटील, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर, दिलीप गिरप यांच्या सहित महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेकी उपस्थितीतांच्या वतीने राज्य गीत सादर करून क्रीडा शपथ घेण्यात आली. यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संघांनी संचलन केले. वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी यांनी प्रतिनिधित्व करत क्रीडा ज्योत पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे सुपूर्द केली. यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बलून सोडून व झेंडा दाखवून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. 

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय उत्कृष्ट असा निर्णय घेत महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. या स्पर्धेदरम्यान विविध जिल्ह्यातून आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वागत केले. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट रित्या या स्पर्धेची तयारी केल्याने त्यांचेही कौतुक केले.  

महसूल विभाग म्हटलं की, छोट्या दाखल्या पासून ते मोठ्या जमिनीच्या व्यवहारापर्यंत लोकप्रतिनिधी, जनता येत असतात. आणि हे सर्व हाताळताना आतापर्यंत आपण आपला प्रशासकीय प्रवास करत आलेले आहात. तुमचं रोजच जीवन हे आव्हानात्मक असत. 

प्रशासकीय कामकाज करत असताना विविध गोष्टींचा ताण हा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर असतो. म्ह्णून अशा पद्धतीसाजे जेव्हा स्पर्धा घेतल्या जातात त्यात आपल्यातल्या कला - क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळाव व आपला ताण दूर व्हावा हा मुख्य हेतू असतो. असेही पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.       

आम्हाला हे सर्व आयोजन करण्यासाठी फार कमी कालावधी मिळाला यात उत्कृष्ट नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. या आयोजनात म्हाडा व वेंगुर्ला नगरपरिषदेचे खूप चांगले सहकार्य मिळाले. या पूर्ण ३ दिवसात आपण सर्वांनी या स्पर्धांचा आनंद घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे या अनुषंगाने या पर्यटनाचा लाभ घेऊन विविध ठिकाणी भेटी द्याव्यात. आणि येथुन जाताना आपल्या पुढील प्रशासकीय कामकाजासाठी उत्साह घेऊन जावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले.