गट, समुह समन्वयक कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील

मंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन
Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 08, 2024 13:46 PM
views 52  views

देवगड :  महाराष्ट्र राज्य गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता कंत्राटी कर्मचारी संघटना यांची  जळगाव येथे वार्षिक राज्यस्तरीय मेळावा  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .यावेळी राज्यातील सर्व गट संसाधन केंद्रातील गट समन्वयक व समूह समन्वयक कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अडीच वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाद्वारे जनतेसाठी व कर्मचार्यांसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले असून गट व समूह समन्वयक कर्मचारी यांना २०२३ साली १३ हजारावरून २५ हजार मानधन वाढ करून न्याय दिल्याबद्दल मंत्री गुलाबराव पाटील यांचा संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. 

त्याप्रसंगी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणारे सर्व योजना व उपक्रम हे गावपातळीवर यशस्वी पणे राबविण्याचे काम हे सर्व  गट समन्वयक, समुह समन्वयक यांनी  सक्षमपणे काम करून विभागाचे नावलौकिक वाढवावा. येणाऱ्या काही दिवसात आपण सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात येईल. आणि राज्यातील सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या कर्मचाऱ्याला न्याय देण्यासाठी मी मंत्री म्हणून नाही तर तुमचा वकील म्हणून भूमिका बजावणार असून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे  सांगितले .

या मेळाव्यात संघटनेचे राज्य अध्यक्ष विलास निकम व राज्य सचिव जयंत वर्मा तसेच सिंधुदूर्गाचे जिल्हा अध्यक्ष अर्जुन गवस, सचिव समिल नाईक , तसेच  राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव आणि सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव जिल्ह्याच्या वतीने जितेंद्र महाजन व  शिरीष तायडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रास्ताविक राज्यध्यक्ष श्री. विलास निकम यांनी केले आणि आभार जिल्हाध्यक्ष सपना राजपूत यांनी मानले.