ग्रुप ग्रामपंचायत केर - भेकुर्लीचा श्रावणधारा महोत्सव ४, ५ आणि ६ ऑगस्टला..!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 16, 2023 20:13 PM
views 133  views

दोडामार्ग :  ग्रामपातळीवरील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओळख असलेल्या आदर्शगाव केर येथील ग्रुप ग्रामपंचायत केर - भेकुर्लीचा श्रावणधारा महोत्सव ४, ५ आणि ६ ऑगस्टला होणार असल्याची माहिती ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतकडून देण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर सत्कार, संस्कृती जोपासणूक, स्वच्छता ते समृद्धी, गाव विकास संकल्प, महिला स्वावलंबन, संयुक्त दशावतार तसेच महत्वाचे म्हणून गाव शिवारातील तब्बल ३५ रानभाजा यांचे प्रदर्शन असे तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत. केर - भेकुर्ली ही ग्रामपंचायत विविध कार्यक्रम हटके पद्धतीने साजरे करत असतेच मात्र ग्रामस्थांचे सांघिक ऐक्य दाखविणारा हा कार्यक्रम दरवर्षी नेहमीच चर्चेत असतो. 

ग्रुप ग्रामपंचायत केर - भेकुर्ली येथील कार्यालयात याबाबतच्या कार्यक्रम नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच व पदाधिकारी, गावातील विविध मंडळाचे प्रतिनिधी, युवक, महिला बचत गट प्रतिनिधी, प्रतिष्ठित ग्रामस्थ आदी उपस्थित होते. ग्रामस्थांनी माहिती देताना सांगितले की, हा महोत्सव म्हणजे, गावाच्या सांघिकतेचा सण आहे. यावर्षी हा महोत्सव तीन दिवस चालणार आहे. गावात विविध कामाच्या माध्यमातून गाव किंवा ग्रामपंचायत यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचा या निमित्ताने सन्मान केला जातो. 

यावर्षीच्या श्रावणधारात नेमके काय असेल?

यावर्षी श्रावणधारा महोत्सवात भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये संस्कृतीची जोपासना करणा-या व्यक्तींचा सन्मान ज्यामध्ये श्री देव पूर्वाचारी पारंपरिक दशावतार नाटय मंडळातील कलाकार, चपय नृत्य कलाकार, "माझ्या माहेरची पैठणी"... ओढ गावची यात गावातील कन्या यांना आमंत्रीत करून त्यांच्यासाठी स्पेशल खेळ घेणे, "आदर्शगावची पैठणी" .. सोहळा माता - भगिनींचा यामध्ये गावातील महिलांसाठी ५० वयावरील एक गट आणि ५० वयाखाली एक गट अशा दोन गटात छोटे खेळ आणि विजेत्यांना बक्षीस म्हणून पैठणी असती. रानभाजी प्रदर्शन, पाककला सेंद्रिय पदार्थ, संयुक्त दशावतार नाटयप्रयोग याबरोबरच सन्मान सोहळा यात 

गावात जे वैदु म्हणून सेवा देत आहेत महिला आणि पुरुष यांचा सन्मान, मुलांचा गुणगौरव आदी कार्यक्रम होणार आहेत. 

केर - भेकुर्ली गावात दळण - वळणाची कोणतीही सोय नसताना गणेशमूर्ती बनविण्याचे काम गावात करुन मोलाचे कार्य करणाऱ्या गावातील गणपती व अन्य कलाकार यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे.

देशसेवा आणि ज्ञानदाना प्रति कृतज्ञता

गावातील माजी सैनिक आणि सेवानिवृत्त शिक्षक सन्मान या श्रावणधारा कार्यक्रमात केला जाणार आहे याचबरोबर स्वछता तिथे समृद्धी - विशेष मार्गदर्शन, माझा गाव स्वच्छ गांव - चित्रकला स्पर्धा, श्रावणधारा अन काव्यधारा(स्वरचित कविता गायन, माझा गाव अन निसर्ग )कृतज्ञता, ग्रामपंचायतला केलेल्या सहकार्याची असे कार्यक्रम होणार आहेत. 

दोडामार्ग तालुक्यातील उपक्रमशील ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केर - भेकुर्ली ग्रामपंचायतच्या महोत्सवात जे रानभाजी प्रदर्शन होणार आहे त्यात तब्बल ३५ भाज्या ज्या गावशिवारातील असणार आहेत.

ग्रामपातळीवरील नंबर वन महोत्सव हे लक्ष.. संकल्प ठरतो गाव विकासाचा 

ग्रामीण भागात एक सुंदर महोत्सव होऊ शकतो हे दाखवणारे नियोजन या महोत्सवात असणार असून गाव विकासात कोणत्या गोष्टीची गरज आहे याचे विचार मंथन या दिवसांत होते शिवाय आगामी वर्षभरात गाव विकासाचे ध्येय्यही ठरवले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शिवाय ग्रामपंचायत संदर्भातील विविध अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री आणि गावविकास संकल्प पूर्तीस मदत करणाऱ्या व्यक्तींनी तीन दिवस बोलावून सन्मानीत करण्यात येणार आहे