कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: February 18, 2026 20:46 PM
views 17  views

कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. त्याचे भूमिपूजन गुरुवार, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य सकाळी ११ वाजता साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 

कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होणार आहे. त्यासाठी आठ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कणकवली शहरातील २८ गुंठे शासकीय जागेवर पहिल्या टप्प्यात तब्बल ८ कोटी रुपये खर्च करून ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारले जाणार आहे. 

भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत समाजाचे नेते एस. टी. सावंत, लवू वारंग आणि सतीश सावंत यांनी भवनाच्या आराखड्याची माहिती दिली. या सांस्कृतिक भवनामध्ये ५०० आसन क्षमतेचे अद्ययावत नाट्यगृह उभारले जाणार आहे. तसेच १५० आसन क्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग घेण्यासाठी स्वतंत्र सभागृह असणार आहे. याशिवाय आर्ट गॅलरी, लहान सभागृह, निवास व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि सुशोभित गार्डनची सुविधाही असणार आहे. तर प्रवेशद्वारावर उभारला जाणारा शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा हे या या वास्तूचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.