
बांदा : बांदा उभाबाजार येथील मुख्य बाजारपेठेत असलेले धान्य व्यापारी स्वप्नील वसंत पावसकर यांच्या किराणा दुकानाला आज सकाळी शॉर्टसर्कीटमुळे आग लागली. ग्रामस्थांनी वेळीच आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ग्रामस्थ धीरज भिसे यांना दुकानाच्या छपरातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने स्थानिक व्यापाऱ्यांना याबाबतची कल्पना दिली. स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविली.
या दुर्घटनेत व्यापारी पावसकर यांच्या दुकानाच्या छपरासह धान्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, भाजपा शहर अध्यक्ष बाबा काणेकर, तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी नुकसानीची पाहणी करत पंचनामा केला. स्थानिकांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने संभाव्य मोठी हानी टळली.