
दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायतच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेत 'साप्ताहिक संस्कृत वर्ग' सुरु करण्याबाबतचा विषय मंजूर करण्यात आला आहे. मासिक सभेसमोर ठेवण्यात आलेल्या विषयास अनुसरुन नगराध्यक्ष व नगरसेवक / नगरसेविका यांनी संस्कृत भाषेचे महत्व ओळखून यासाठी नगरपंचायत हद्दीतील पिंपळेश्वर हॉलमध्ये दर शनिवारी 'संस्कृत वर्ग' सुरु करण्यासाठी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिली आहे.
कसई दोडामार्ग नगरपंचायत मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला. पिंपळेश्वर गणेशोत्सव मंडळाला विश्वासात घेवून व प्रशासकीय सर्व बाबी पूर्ण करुन लवकरात लवकर साप्ताहिक संस्कृत वर्ग सुरु करण्यात येणार आहे . सर्व इच्छुक विद्यार्थी / विद्यार्थीनींनी संस्कृत भाषा शिकण्याचा लाभ घ्यावा व सर्व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांची नावे व त्यासोबत आधारकार्ड नगरपंचायत कसई - दोडामार्ग मध्ये देण्यात यावे,
असे आवाहनही नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी केले आहे.
या मासिक सभेत नगरपंचायत हद्दीतील विविध विकासकामांची चर्चा झाली व सर्व विकासकामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली . त्याचप्रमाणे नगराध्यक्षांनी सर्व विकासकामांची कार्यवाही लवकरात लवकर करावी असे आदेश दिले आहेत . या सभेस उपनगराध्यक्ष देविदास गवस , बांधकाम सभापती नितीन मणेरीकर , शिक्षण व आरोग्य सभाप श्रीम.गौरी पार्सेकर , महिला व बालकल्याण सभापती श्रीम.ज्योती जाधव , महिला व बालकल्याण उपसभापती श्रीम. क्रांती जाधव तसेच नगरसेवक, नगरसेविका व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.अशी माहिती नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिद्ध पञकात म्हटली आहे.