
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिवउत्सवाची सुरुवात पहाटे ५.३० वाजता मशाल रॅलीने होणार आहे. सकाळी ९.३० वाजता ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक सोहळा पार पडेल. सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत लेझीम नृत्य, वेषभूषा स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान स्नेहभोजन व हळदी-कुंकू कार्यक्रम होणार असून, रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत दशावतार नाटक सादर केले जाणार आहे.
या शिवजयंती उत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. विशेषतः बादल चौधरी यांच्या उपस्थितीत ट्रॉफी व बक्षिसांचे वितरण होणार आहे.हा उत्सव मळगाव येथील भिल्लवाडी गृप यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच उत्सव अधिक भव्य आणि यशस्वी होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. जय भवानी! जय शिवाजी!” या घोषणांनी संपूर्ण मळगाव दुमदुमून जाणार असून, शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.










