राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ

नळपाणी योजना, माजगाव धरणाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन दीपक केसरकरांच्या संकल्पना नाविण्यपूर्ण : एकनाथ शिंदे
Edited by: विनायक गावस
Published on: February 10, 2024 11:20 AM
views 43  views

सावंतवाडी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर नाविन्यपूर्ण संकल्पना शिक्षण विभागात राबवीत आहेत‌. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आमचा अधिक भर आहे. राज्याचा सर्वांगीण विकास बोलून नाही तर तो आम्ही करुन दाखवत आहे. हे सरकार गतिमान, धाडसी निर्णय घेणार सरकार आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ व माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेच भुमिपूजन त्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. 

सावंतवाडी जिमखाना येथे आयोजित ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच माजगाव धरण व सावंतवाडी नळपाणी योजनेच भुमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल. याप्रसंगी ऑनलाईन प्रणालीद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रत्यक्ष उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भारत व महाराष्ट्र विज्ञानाच्या दृष्टीने प्रगतीपथावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेले विद्यार्थी नव्या आधुनिक भारताचे एक घटक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विज्ञान व संशोधनाला पंख देण्याच काम केलं आहे. विज्ञान क्षेत्रात देशान मोठं योगदान दिलं आहे. आज राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन सावंतावडीत होत आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाच यासाठी करावं तेवढं कौतुक थोड आहे. विविध उपक्रमातून चांगलं शिक्षण देण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर नाविन्यपूर्ण संकल्पना शिक्षण विभागात राबवीत आहेत‌. शासकीय शाळा खाजगी शाळेंच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मराठी भाषा संवर्धनासाठी ते कार्यरत आहेत. आरोग्य, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधांना महत्व देणार आमचं सरकार आहे. यात शिक्षणाला अधिक प्राधान्य दिलं आहे‌. कौशल्य विकासाला गती देण्याच काम आम्ही करत आहोत. यांसह नळपाणी योजनेच्या शुभारंभ, धरणाचा शुभारंभ आज झाला आहे. यामुळे पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार आहे‌. पावसाचं पाणी अडवून पाणी वाचविण्यासाठी असे प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकरी वर्गाला यांचा फायदा होईल तसेच स्वच्छ व सुंदर शहरांसाठी मोहीम आम्ही हाती घेतली आहे‌. विकासाला गती देण्याच काम महायुती सरकार करत आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. हे सरकार गतिमान सरकार आहे असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.

तसेच या कार्यक्रमाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ऑनलाईन उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. सावंतवाडी शहराचा विकास झपाट्याने होत आहे‌. महायुतीच्या सरकारमुळे विकासाला गती येत आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाठपुरावा केलेल्या नळपाणी योजनेचा आज शुभारंभ होत आहे. यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मेहनत घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना होऊ शकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व नेते एकत्र आहोत. विकासासाठी आमचा नेहमी पुढाकार आहे असं मत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केलं.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जे इंजीनियरिंगच शिक्षण मराठीतून देत आहे‌. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे. वैद्यकीय शिक्षण देखील मराठीतून दिलं जाईल. स्वताच्या भाषेत शिक्षण घेणारी मुलं यशस्वी झाली आहेत. आमची मुलं एवढी हुशार आहेत की जगामध्ये ती आपल नाव चमकवू शकतात. मुलांमधील कौशल्याला वाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर असतो. त्यामुळेच शिक्षण खात असे उपक्रम राबवित आहेत. महायुतीच सरकार येत्या काळात शैक्षणिकक्रांती करताना दिसेल. तर ही मुलं महाराष्ट्राच वैभव आहे‌. प्रयोग करणाऱ्या मुलांमधून देशातील नवं वैज्ञानिक घडणार आहेत‌ असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सेलिब्रिटी स्कूलची नवी संकल्पना येत्या काळात सुरु होत आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. तर सावंतवाडीचा पाणी टंचाईचा प्रश्न मिटला आहे. माजगाव धरण व नळपाणी योजनेचा शुभारंभ झाला आहे‌. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी भरीव निधी दिल्यान सावंतवाडीवासियांकडून केसरकर यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले‌.

मुख्याधिकारी सागर साळुंखे, उपसंचालक महेश चोथे, संचालक राहुल रेखावर, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली. सुरुवातीला भोसले नॉलेज सिटीच्या मुलांनी स्वागत व विज्ञान गीत सादर केलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी यांनी तर आभार शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक व प्रा. अमर प्रभू यांनी केलं. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत -भोसले,मुख्यकार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, विज्ञान मंडळाच्या संचालिका राधा अतकरी, अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी न.प.चे मुख्याधिकारी सागर साळुंखे, शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, ॲड. निता सावंत, बाबु कुडतरकर, आर्किटेक्ट अमित कामत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, नितीन मांजरेकर, म.ल.देसाई, गणेशप्रसाद गवस, राजू निंबाळकर, विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग काकतकर, माजगांव सरपंच डॉ.अर्चना सावंत, कुणकेरी सरपंच सोनाली सावंत, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 भोसले नॉलेज सिटीचा गौरव !

या भव्य विज्ञान प्रदर्शनाच्या नियोजनामध्ये कोकणातील शैक्षणिक ब्रॅण्ड असणाऱ्या भोसले नॉलेज सिटीनं आयोनाचा भार उचलला आहे‌. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर यांना यशवंतराव भोसले इंटरनॅशल स्कुल सावंतवाडीची मजबूत साथ लाभली आहे. यासाठी या संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले यांचा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व शिक्षण विभागाच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. तसेच भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांना गौरविण्यात आलं. 

बालवैज्ञानिकांच शिक्षणमंत्र्यांकडून कौतूक

राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचा शुभारंभ शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर तावडे उपस्थित होते. यात राज्यभरातील तब्बल 500 वैज्ञानिक प्रतिकृती सहभागी झाल्या आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्यक्ष या वैज्ञानिक प्रतिकृतींची माहिती घेत विद्यार्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली‌. या प्रदर्शनात शेकडो बालवैज्ञानिक सहभागी झाली आहेत. १४ फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्व लोकांसाठी खुले असणार आहे. याला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद याला लाभत आहे.

भाजपनं फिरवली पाठ !

या कार्यक्रमात सावंतवाडीतील विकासकामांच्या भूमिपूजनाच आयोजन करण्यात आलं होत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऑनलाईन पद्धतीने ही भुमिपूजन करणार होते‌. मात्र, त्या आधीच भाजपन विकासाचे नारळ फोडले होते. माजी आमदार राजन तेली यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम करण्यात आले‌. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिलं नसल्यानं भाजपनं या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचे जाहीर केल. तर सावंतवाडी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निमंत्रण न दिल्यानं निषेध करण्यात आल्याचेही भाजपच्यावतीने सांगण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक भाजपच्या मंडळींनी पाठ फिरवली होती. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची ऑनलाईन उपस्थिती या कार्यक्रमास होती. महायुतीचे सर्व नेते एकत्र आहोत असं मत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या कार्यक्रमात व्यक्त केल होत.