'अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स' चा उद्या भव्य शुभारंभ..!

Edited by: विनायक गावस
Published on: March 23, 2024 08:49 AM
views 244  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजगाव उद्यमनगर येथे प्रथमच 'आयटी' चा स्टार्टअप होत असून 'अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स 'चे उद्या २४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता 'ग्रँड ओपनिंग' होणार आहे. प्रतिथयश महिला उद्योजिका अन्नपूर्णा कोरगावकर यांचे वडील श्रीरंग मंजुनाथ आचार्य ( हळदीपूर ) तसेच गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांचे वडील भिकाजी देऊ कानसे व  सावंतवाडीच्या माजी नगरसेविका ॲड. पुष्पलता कोरगावकर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत या कंपनीचा शुभारंभ होणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन सौ. ऐश्वर्या कोरगावकर यांनी यावेळी केले. 

सिंधुदुर्गातील मुलांमध्ये टॅलेंट असून या टॅलेंटला वाव देण्यासाठी आयटीचा पायलट प्रोजेक्ट आम्ही सुरू करीत असून भविष्यात १० हजार बेरोजगार युवक युवतींना रोजगार देण्याचं आमचा मानस आहे अशी माहिती अन्नपूर्णा टेक सोर्सच्या प्रोप्रायटर ऐश्वर्या कोरगांवकर, सीईओ सौ. अन्नपूर्णा कोरगावकर व गो सोर्सचे सीईओ संतोष कानसे यांनी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अखिलेश कोरगावकर, दत्तप्रसाद कोरगांवकर आदी उपस्थित होते.

मुंबई पुण्याच्या धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयटी क्षेत्रातील कंपनी सुरू होत असून सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांची कन्या ऐश्वर्या शेठ - कोरगावकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यातील माजगाव उद्यमनगर येथे 'अन्नपूर्णा टेक सोर्स अँड गो सोर्स ' हा आयटीचा स्टार्टअप असलेला पायलट प्रोजेक्ट सुरू केला जात आहे.  या स्टार्टअप कंपनीत सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २४ युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच १०० जणांना रोजगार देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखवला. तर भविष्यात या कंपनीच्या माध्यमातून दहा हजार रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक युवती आयटी क्षेत्रात काम करण्यासाठी पुणे मुंबई व देश विदेशातील अन्य शहरांमध्ये जात असतात. अशा मुलांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न आहे. येथील मुलांमध्ये टॅलेंट ची कमतरता नाही मात्र त्यांच्या टॅलेंटला वाव देण्याची गरज आहे. याच हेतूने आम्ही या कंपनीत स्थानिकांनाच संधी देणार आहोत असे त्यांनी आवर्जून सांगितले. पुणे मुंबईतील कंपनीच्या धर्तीवरच  येथील मुलांनाही वेतन व अन्य सुविधा देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेसारख्या देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध आहे मात्र येथे युवकांची वानवा आहे. त्यामुळे अमेरिकेतील रियल इस्टेट हेल्थकेअर व मोर्गेज इंडस्ट्रीसाठी या आयटी कंपनीच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. यासाठी पुणे मुंबईतील प्रशिक्षक येथील मुलांना कोडींग बिलिंग व अन्य बाबतचे प्रशिक्षण देणार आहेत. दिवसा व रात्री अशा दोन्ही सत्रात येथे काम चालणार असून येथे काम करणाऱ्या मुलांची व विशेष करून महिलांची योग्य ती काळजी व सुरक्षितता कंपनीकडून घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सावंतवाडी तालुक्यातील सातोळी येथील संतोष कानसे हे ' गो सोर्स ' कंपनीचे सीईओ असून त्यांनी आतापर्यंत विविध देशी व विदेशी कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांच्या माध्यमातून या कंपनीचे काम देखील चालणार आहे. या कंपनीच्या निर्मितीसाठी एम एस एम ई, जिल्हा उद्योग केंद्र, एम एस ई बी, माजगाव ग्रामपंचायत तसेच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या माध्यमातून बेरोजगारांसाठी अनेक संधी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्याचा बेरोजगारांनी लाभ घ्यावा व स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा असे आवाहन यावेळी सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केले.