कणकवलीत वारकरी संप्रदायाचा ९ नोव्हेंबरला भव्य दिंडी सोहळा

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: October 14, 2025 18:20 PM
views 38  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्या वतीने रविवार ९ नोव्हेंबर रोजी, कणकवली येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीवर्ष आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त कणकवली शहरात वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यावतीने भव्य "वारकरी दिंडी" चे आयोजन करण्यात आले आहे. एसटी वर्कशॉप येथील गणेश मंदिर येथून ही दिंडी परमपूज्य भालचंद्र महाराज मठापर्यंत जाणार आहे. या वारकरी दिंडीत २५० मृदुंग वादक, तेवढेच टाळकरी, विणेकरी, तुळस, कलश घेऊन या वारीत सहभागी होणार आहे. न भूतो न भविष्यती अशी ही वारकरी दिंडी कणकवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग यांची नुकतीच कणकवली येथे बैठक झाली. या बैठकीत अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, सचिव गणपत घाडीगावकर, कार्याध्यक्ष संतोष राऊळ, खजिनदार मधुकर प्रभूगावकर, उपाध्यक्ष राजेंद्र राणे, चंद्रकांत परब, विजय सुतार, प्रभाकर सावंत, विनायक मेस्त्री, तुषार मेस्त्री,निवृत्ती मेस्त्री, लक्ष्मण कडव, सर्वोत्तम साटम,दीपक मडवी, सत्यवान परब,रामचंद्र कदम, शामसुंदर राणे, गणपत पांचाळ, राजन साळुंखे, शंतनू गावकर, अच्युत घाडीगावकर संभाजी मेस्त्री, नाना गावडे, जनार्दन परब, निलेश कदम, सुरज पवार, गुरुनाथ चव्हाण, प्रभाकर राणे,चंद्रकांत पाटील, यांच्यासह सर्व तालुक्यांचे अध्यक्ष आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत वारकरी दिंडीचे नियोजन करताना या दिंडीत जे मृदुंगमणी व विणेकरी टाळकरी तुळस, कळस घेऊन सहभागी होणार आहेत त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या ठिकाणी दुपारी पंक्ती भोजनाचे सुद्धा व्यवस्था करण्यात आलेले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम वारकऱ्यांनी आणि जनतेने या वारकरी दिंडीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्या वतीने करण्यात आले आहे.