
वेंगुर्ले : भाजपा नेते, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार मा. नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रेडी येथे प्रितेश राऊळ मित्रमंडळ पुरस्कृत आणि दशावतार कला प्रेमी ग्रुप-रेडी यांच्यावतीने गुरुवार १० ते सोमवार १४ एप्रिल असा पाच दिवसीय भव्य स्वरूपाचा "दशावतार नाट्य महोत्सव आयोजित केला आहे.
दरवर्षी रेडी येथे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित केला जातो. त्यानुसार यावर्षी महोत्सव पाच दिवस चालणार आहे. पाच नाविन्यपूर्ण दशावतारी नाटके नाट्य रसिकांना पहावयास मिळणार आहेत. दररोज सायंकाळी ७.३० वाजता ही दशावतारी नाटक सुरू होणार आहेत. गुरुवार दि. १० एप्रिल रोजी "माहावीर बरबरीक" मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे, कुडाळ, शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी "'पुत्र झाला दगड'" श्री देवी माऊली दशावतार नाट्य मंडळ इन्सुली, शनिवार दि. १२ एप्रिल रोजी "देवी कुस्मांडा'" ओंकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळ, कालेली यांचे, रविवार दि. १३ एप्रिल रोजी "राजा गोपीचंद'" आजगावकर दशावतार नाट्य मंडळ, आजगाव यांचे आणि महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवार दि. १४ एप्रिल रोजी "दंभासुर शिवतेज हरण" हे तेंडोलकर दशावतार नाट्य मंडळ, झाराप यांचे दशावतारी नाटक सादर होणार आहे.
रेडी ग्रामपंचायत पटांगण, रेडी ग्रामपंचायत नजिक होणाऱ्या या दशावतारी नाट्यमहोत्सवाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे माजी जिल्हा परिषद सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी अण्णा गडेकर ९४२३८३५६१६ यांच्याशी संपर्क साधावा.