वायरमन बदलीप्रकरणी गोवेरीवासियांचा ठिय्या

महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव
Edited by: रोहन नाईक
Published on: July 03, 2023 16:15 PM
views 306  views

कुडाळ :  कुडाळ तालुक्यातील गोवेरी गावात महावितरणचे वायरमन किशोर गणपत मार्गी यांची प्रशासकिय नियमानुसार उपविभाग सावंतवाडी येथे बदली झाली. या बदलीला विरोध म्हणून आज सकाळी १०.३० वाजता गोवेरीवासियांनी कुडाळ मधील महावितरणच्या कार्यालयावर धडक देवून ठिय्या आंदोलन पुकारले.

जवळपास १३० ते १५० गोवेरी गावातील नागरिकांनी एकत्र येत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. आर. मिसाळ यांनी धारेवर धरले. गोवेरी गावातील वायरमन मार्गी यांची बदली रद्द करा, या केवळ मागणीसाठी जमलेल्या नागरिकांनी मिसाळ यांना बदलीबाबत जाब विचारला. मात्र, महावितरणचे अधिकारी मिसाळ हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे सर्व  गोवेरीवासियांनी अधिकारी मिसाळ यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पोलिस प्रशासनाला सुद्धा पाचारण करण्यात आले.

त्यावेळी मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, माजी उपतालुकाध्यक्ष दीपक गावडे, बाबल गावडे, भाजप युवा पदाधिकारी रुपेश कानडे, नेरूर माजी सरपंच शेखर गावडे यांनी सुद्धा या प्रकरणी वायरमन मार्गी यांची तत्काळ बदली रद्द करा, असा आक्रमक पवित्रा घेतला. अखेर महावितरणने नमते घेत गोवेरी गावातील वायरमन मार्गी यांच्या बदलीला तात्पुरती स्थगिती दिली.