सरकारी रूग्णालयात बाळंतीनींची हेळसांड !

हात धुवायला देखील नाही पाणी ; न.प. अधिकाऱ्यांनी दाखवली तत्परता
Edited by: विनायक गांवस
Published on: May 25, 2023 20:54 PM
views 366  views

सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नको, आधी उप जिल्हा रुग्णालयातच सुविधा पुरवा अशी संतप्त भावना रूग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. गुरूवारी रूग्णालयात पाणी नसल्यानं बाळंतीनींना हात धुवायला देखील पाणी शिल्लक नव्हत. परंतु, रूग्णालय प्रशासनाच याकडे दुर्लक्ष असल्यानं गरोदर व नुकतीच प्रसुती झालेल्या मातांची हेळसांड केली गेली. कोकणसादनं मुख्याधिकारी सागर साळुंखे व पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे यांना संपर्क केल्यानंतर नगरपरिषदेन रूग्णालयास बंबान पाणीपुरवठा करत गैरसोय दुर केली. परंतू, रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाळंतींनीना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्यान रूग्णांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. 


उपजिल्हा रुग्णालयात पाण्याचा तुटवडा असल्यान रूग्णांसह गर्भवती महिला, बाळंतीनींची पाण्यावाचून हेळसांड झाली. बराच वेळ हात धुवायला देखील पाणी नसल्याने रूग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता पाण्याचा तुटवडा आहे असं सांगितलं गेलं.याबाबत कोकणसादशी संपर्क साधत गंभीर परिस्थिती कथन केली.यानंतर मुख्याधिकारी सागर साळुंखे व पाणी पुरवठा अधिकारी भाऊ भिसे यांना  संपर्क केल्यानंतर रूग्णालयास नगरपरिषदेच्या बंबान नंदू गांवकर यांनी पाणीपुरवठा करत गैरसोय दुर केली. 


परंतु, रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बाळंतींनीना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. न.प.कडून कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असून मोती तलावाच पाणी आटवल्यामुळे रूग्णालयाची विहीर आटली आहे. त्यामुळे ही गैरसोय निर्माण झाली आहे. रूग्णांना पुरेसं पाणी उपलब्ध नाही अशी माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. 


दरम्यान, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत बंबान पाणी पुरवठा करणारे पाणी पुरवठा अभियंता भाऊ भिसे म्हणाले, नगरपरिषदेकडून दोन टाईम पूर्णपणे पाणी पुरवठा केला जातो. कमी पाणी पुरवठा केला जात नाही. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रूग्णालय प्रशासनाकडून सुचना केल्यास बंबान सुद्धा पाणी पुरवल जात असल्याच ते म्हणाले. मात्र, वैद्यकीय अधिक्षक रूग्णालयात उपस्थित नसल्यानं त्यांची भुमिका समजू शकली नाही. डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर हे ६ दिवसांनी निवृत्त होणार असल्यानं त्यांच्या जागी स्त्री-रोगतज्ञ व वैद्यकीय अधिक्षक या दोन्ही पदांवर तातडीनं नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली. कारण, जोपर्यंत स्वतःवर प्रसंग येत नाही तोवर इथल्या गंभीर परिस्थितीची जाणीव होणार नाही अशी भावना व्यक्त करत रूग्णांच्या नातेवाईकांनी घडल्या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.