पुर्वा गावडे हिला शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर

जलतरण खेळात केलेल्या कामगिरीची घेण्यात आली दखल
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 13, 2024 11:03 AM
views 259  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी- ओरोस येथील पूर्वा संदीप गावडे हिने जलतरण खेळात मोलाची कामगिरी बजावून जिल्ह्याचा मान वृद्धिगत केल्याबद्दल शासनाच्या क्रीडा विभागा मार्फत २०२३-२४ चा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.१५ ऑगस्टला स्वातंत्र्यादिनी पोलीस परेड मैदानावर होणाऱ्या झेंडावंदन सोहळ्यात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली आहे.

सिंधुदुर्गनगरी - ओरोस येथील पूर्वा गावडे ही पाच वर्षाची असल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावात जलतरणचा सराव करत होती. तीने लहान वयातच जिल्हा ,विभाग व राज्य स्तरापर्यतच्या जलतरण स्पर्धामध्ये यश मिळविल्यानंतर तिच्या खेळाची चुणूक लक्षात घेऊन शासनाच्या पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये सातवी मध्ये असतानाच जलतरणच्या राज्य व राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली. त्याठिकाणीच ती सद्या राष्ट्रीय प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनााखाली जलतरणचे राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असून बारावीचे शिक्षणही तिथेच घेत आहे. 

पूर्वा हिने जलतरण मध्ये आतापर्यत जिल्हा स्तरावर १९ पदके ,विभागस्तर २ पदके, राज्यस्तर २८ पदके आणि राष्ट्रीय स्तरावरील ९ पदके मिळवून एकूण ५८ पदकांची कमाई केली आहे खेलो इंडिया मध्ये सुद्धा जानेवारी २०२४ मध्ये ती खेळली आहे. तीने दिल्ली ओरिसा,अहमदाबद,गोवा, चेन्नई याठिकाणी झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत खेळून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. २०२२ मध्ये झालेल्या वॉटर पोलो राष्ट्रीय स्पर्धेत सिल्व्हर मेडल मिळविलेले आहे . नुकत्याच ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळविले आहे. २०२३ मध्ये झालेल्या महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेत सुद्धा दोन गोल्ड व दोन सिल्व्हर मेडल मिळविली आहेत. तीने जलतरण खेळा बरोबरंच धावण्याचा सराव करत असते तीने १० किलोमीटर धावणे मेरेथॉन राज्यस्तर स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल घेतलेले आहे.

पूर्वाने जलतरण खेळात आतापर्यत जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत केलेल्या कामगिरीची दाखल घेऊन जलतरण खेळात उत्कृष्ट  कामगिरी करून जिल्ह्याचा मान वृद्धिगत केल्याबद्दल शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालय अतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत २०२३-२४ चा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे रोख रक्कम ,प्रमाणपत्र व ट्रॉफी असे पुरस्कराचे स्वरूप आहे.