
सावंतवाडी : चौकुळ गावातील कबुलायतदार गावकर जमीनीचे वाटप करण्यासंदर्भात गावाने निवडलेल्या समितीला शासनाने मान्यता दिल्याने चौकुळ ग्रामस्थांनी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार व्यक्त केले. तुम्ही अशाच प्रकारे पुढे व्हा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत असा विश्वासही ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात मंत्री केसरकर व उपस्थित अधिकाऱ्यांचे आभार मानले. यावेळी समितीच्या माध्यमातून कुटुंब निश्चिती करुन जमिनीचे वाटप करा अशा सुचना मंत्री केसरकर यांनी प्रशासनाला केल्या.
चौकुळ येथील कबुलायतदार गावकर जमिनीचे समप्रमाणात वाटप होण्यासाठी ग्रामस्थांच्या मागणीनुसार ६५ जणांची समिती गठीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचे शासनाचे पत्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी गावाचे प्रतिनिधी सोनू गावडे, विठ्ठल गावडे व भिकाजी गावडे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी उपस्थित चौकुळ ग्रामस्थांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात मंत्री दीपक केसरकर यांच्यासह उपस्थित जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचे आभार मानले. चौकुळ गावाच्या कबुलायतदार गावकर जमीन वाटप संदर्भात ग्रामस्थांनी केलेली मागणी व दिलेल्या ठरावानुसार ६५ जणांची समिती गठीत करण्याबाबत चौकूळ गावाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव घेऊन शासन स्तरावर या समितीला मान्यता मिळण्याबाबत मागणी केली होती. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले होते. या संदर्भात मंत्रालय पातळीवर बैठक होऊन ग्रामस्थांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील देऊन समिती गठीत करण्यास मान्यता दिली.
त्यानुसार आज या ठिकाणी चौकूळ ग्रामस्थांच्या उपस्थितीत मंत्री दीपक केसरकर यांनी शासन मान्यतेच्या पत्राचे वाचन केल्यानंतर पत्र गावाचे प्रमुख प्रतिनिधी यांना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख बबन राणे आदी उपस्थित होते.यावेळी उपस्थित चौकुळ ग्रामस्थांशी संवाद साधताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, गावाची एकी कशी असावी याचे एकमेव उदाहरण म्हणजे चौकुळ गाव आहे.गावातील जमिनीचे समान वाटप व्हावे ही गावाची मागणी होती. त्यानुसार गावाने समिती गठीत केली होती त्याला शासनाने आता मान्यता दिली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष दिले. या पुढील कार्यवाही ही सदर समिती व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केली जाईल. त्यामुळे गेली अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यापुढेही गावाच्या विकासाकरिता सर्वांनी एकत्रितपणे पुढे यावे तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, अशी ग्वाही यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. गावाने ज्याप्रमाणे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकही दाखवली तसेच एकी गावाच्या विकासासाठी सुद्धा दाखविणे आवश्यक आहे. शेती, पर्यटन , दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन यासारख्या व्यवसायांच्या माध्यमातून गावाचा विकास साधावा. तुम्ही केलेल्या प्रयत्नांना माझा नेहमीच पाठिंबा राहील,असे ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले, चौकुळ येथील कबूलायतदार गावकर जमीन वाटपाबाबत ग्रामस्थांनी ज्याप्रमाणे मागणी केली त्यानुसार शासनाने समिती गठीत करण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार गावात कुठलाही वाद न होता या समितीच्या माध्यमातून जमिनीचे समान वाटप करण्यासाठी निश्चितच शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. तसेच यापुढेही गावाच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी गावाच्या पाठीशी राहील असे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. शासनाने मान्यता दिलेल्या समितीस मुळ कबुलायतदार गावकऱ्यांचे हक्क अबाधित ठेवणे तसेच गावामध्ये स्थायिक सर्व कबुलायतदार गावकऱ्यांना कुटुंब यादीप्रमाणे आणेवारीनुसार जमिन वाटपाचे अधिकार कबुलायतदार गावकर समितीकडेच राहतील. समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव हे कबुलायतदार गावकर समितीतील सदस्य असतील व ते निवडण्याचे अधिकार कबुलायतदार गावकर समितीलाच असतील
आणि कुटुंब निश्चितीचे सर्वस्वी अधिकार कबुलायतदार गावकर समितीलाच राहतील. तसेच कबुलायतदार गावकर जमिनीसंदर्भातील सर्व अधिकार (पॉवर ऑफ ॲटर्नि) कबुलायतदार गावकर सोनु धोंडू गावडे, विठ्ठल गणपत गावडे व भिकाजी आप्पा गावडे यांना राहतील.नियुक्त गावसमिती मार्फत गावपातळीवर करण्यात आलेल्या शिफारसी जिल्हाधिकारी विचारात घेतील. तदनंतर जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व सहाय्यक संचालक नगररचना हे नियमानुसार पुढील कार्यवाही करतील असे शासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.