दर महिन्याला पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी

Edited by: मनोज पवार
Published on: September 09, 2025 20:57 PM
views 109  views

चिपळूण : स्वच्छ सर्वेक्षण २०२५च्या पार्श्वभूमीवर चिपळूण नगर परिषद, सह्याद्री निसर्ग मित्र आणि नाटक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त चिपळूण होम मिनिस्टर कार्यक्रम राबविण्यात येत असून हा उपक्रम सप्टेंबर २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान सुरू राहणार आहे. या मोहिमेत महिलांना दर महिन्याला पैठणी जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली 


कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक ५०० ग्रॅम प्लास्टिकसाठी एक कुपन दिले जाईल, किमान सात कुपन मिळविणाऱ्या महिलांना लकी ड्रॉमध्ये सहभागी होता येणार असून सर्वाधिक प्लास्टिक जमा करणाऱ्या व लकी ड्रॉ विजेत्याला पैठणी बक्षीस मिळेल. मोहिमेत सहभागी सर्व महिलांना खेळ पैठणीचा या खेळात सहभागी होता येईल, तर नवीन जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून देणाऱ्या एका महिलेला देखील पैठणी दिली जाणार आहे. 


चिपळूण शहराचे सात विभाग करण्यात आले असून प्रत्येक विभागात आठवड्यातून ठरलेल्या दिवशी नगर परिषदेची गाडी घरोघरी जाऊन प्लास्टिक संकलन करणार आहे. या उपक्रमासाठी नोंदणी करण्यासाठी ७२७६०४१७०१ या क्रमांकावर WhatsAppद्वारे आपले नाव व पत्ता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रशासक व मुख्याधिकारी विशाल भोसले, संचालक भाऊ काटदरे व सह्याद्री निसर्ग मित्र व नाटक कंपनीचे अध्यक्ष मानस संसारे प्रयत्नशील आहेत. अधिक माहितीसाठी आरोग्य निरीक्षक सुजित जाधव (मो.८०८७९७५७०८) व आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते (मो.९६०४१३७४९९) यांच्याशी संपर्क साधावा. या उपक्रमातून महिलांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ व हरित चिपळूणची स्वप्नपूर्ती घडविण्याचा नगर परिषदेचा संकल्प आहे, असे मुख्याधिकारी विशाल भोसले म्हणाले.