येणारा काळ कोकणसाठी सुवर्णकाळ...!

नौदल दिनाने कोकणचं वैभव पोहचलं जागतिक पातळीवर
Edited by:
Published on: December 05, 2023 10:34 AM
views 94  views

संदीप देसाई | संपादक - दै. कोकणसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारत सर्वोच्च महत्त्व असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सानिध्यात न भूतो न भविष्यती असा नौदल दिन साजरा झाला. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व संपूर्ण जागतिक पातळीवर पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झाले. सहाजिकच पर्यटन जिल्हा म्हणून जगात ओळख असलेल्या सिंधूदुर्गच्या पर्यटनाला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

किंबहुना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात 'साथियो, विरासत भी और विकास भी, यही विकसित भारत का हमारा रास्ता है, कोकण का परिसर अद्भुत है, अस सांगत आमचं सरकार या क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत हे ऐतिहासिक वैभव जपण्याचा मनोदय  व्यक्त केला. आणि कोकणातील हेच ऐतिहासिक वैभव व गौरवशाली विरासत पाहण्यासाठी देशभरातून लोक यावेत, यासाठी केंद्र सरकार सुद्धा येथील पर्यटनाला चालना देणार असल्याचे म्हटले आहे. यातून पर्यटन वाढ होईल व कोकणात रोजगार, स्वयं रोजगार वाढेल असे सांगायला सुद्धा पंतप्रधान मोदी विसरले नाहीत. त्यामुळे येणारा काळ हा पर्यटनाच्या बाबतीत सिंधुदूर्गसाठी सुवर्णकाळ बनून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. 

संपुर्ण जगाला आदर्श असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत त्यांनीच उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्याच्या ठिकाणी आपल्या देशाचं शक्तिशाली नौदळ देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री आणि राज्याचे सर्वच बडे मंत्री यांच्या समक्ष भव्य दिव्य 'नौदल दीन ' साजरा करून देशात असलेलं सिंधुदूर्गचे महत्व ज्यावेळी अधोरेखित करतं त्यामुळे तरी राज्यातील तथाकथित राजकारणी आता खऱ्या अर्थानं जागे व्हावेत आणि हा सर्वोच्च ऐतिहासिक ठेवा जपून याद्वारे खऱ्या अर्थाने पर्यटन जिल्ह्यात पर्यटन विकास साधण्यासाठी सज्ज व्हावे एवढीच माफक अपेक्षा आहे.     

दस्तुरखुद्द देशाचे पंतप्रधान जेंव्हा सिंधुदुर्गच्या वीरभूमीतून नौसेना दिनाच्या शुभेच्छा देणं ही गौरवशाली बाब आहे असं सांगतात. सिंधुदुर्ग ऐतिहासिक किल्ल्याला पाहताना प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो, असा उल्लेख करतात त्याच वेळी ऐतिहासिक व पर्यटन सिंधुदूर्ग जिल्ह्याचे सामर्थ्य अधोरेखित होतं. आणि याच भूमीत सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा अनावरण झाल्याने व त्याच ठिकाणीं तारकर्ली समुद्र किनारी देशाचा नौदल दीन साजरा झाल्याने साहजिकच हा भाग आणि सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा एकदा देशपातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर झळकला आहे. याच संधीच सोन जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या लोक्रतिनिधींनी करत पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पर्यटन वृध्दींगत होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच जिल्हावासियांनी ज्याप्रमाणे आजचा दिवस जिल्ह्यासाठी सुवर्णदीन असल्याचा आनंद साजरा केला, तो खऱ्या अर्थाने द्विगुणित होणार आहे.