अंडर - १६ क्रिकेट स्‍पर्धेत गोवा संघ विजेता..!

सावंतवाडीतील जिमखाना मैदानावरील गोवा ज्‍युनिअर प्रिमिअर लिग स्‍पर्धा : चेन्‍नई संघाला उपविजेतेपद
Edited by:
Published on: February 03, 2024 14:06 PM
views 67  views

लक्ष्‍मण आडाव | सावंतवाडी : गोवा ज्‍युनिअर प्रिमिअर लिग आयोजित अंडर-१६ आंतरराज्‍य लेदर बॉल क्रिकेट स्‍पर्धा सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर शनिवारी (दि. ३ फेब्रुवारी) पार पडली. शनिवारी चेन्‍नई विरुध्‍द प्रोफेशनल गोवा यांच्‍यात झालेल्‍या अटीतटीच्‍या लढतीत चेन्‍नई संघावर गोवा संघाने ७ गडी राखून मात करत विजय मिळविला. गोवा ज्‍युनिअर प्रिमिअर लिग आयोजित एस. के. ॲकॅडमी कोलगाव यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने अायोजित केलेल्‍या या स्‍पर्धेत चेन्‍नई संघाने उपविजेतेपद पटकावले.

या स्‍पर्धेतील अंतिम सामना चेन्‍नई आणि गोवा यांच्‍यात झाला. टॉस जिंकून  प्रथम फलंदाजी करताना चेन्‍नई संघाने २० षटकात ६ गडी बाद ११८ धावा केल्‍या. त्‍याला प्रत्‍युतर देण्‍यासाठी ११८ धावांचे आव्‍हान घेवून उतरलेल्‍या गोवा संघाने १६.४ षटकात ११९ धावा करत हा सामना ७ गडी राखून आरामात जिंकला. यामध्‍ये गोवा संघाच्‍यावतीने रेयान केरकर याने ३४ तर स्‍वप्‍नेश नाईक याने २६ धावा केल्‍या. तर चेन्‍नई संघाच्‍यावतीने खेळताना महादेवन याने ४१ धावांचे योगदान दिले. अखेर गोवा संघ या स्‍पर्धेतील अंतिम विजेता ठरला. 

या स्‍पर्धा एस. के. ॲकॅडमीचे संस्‍थापक नंदकुमार कदम, अध्‍यक्ष निदेश सावंत (कोलगाव) यांच्‍यावतीने या स्‍पर्धा आयोजित केल्‍या होत्‍या. गेले सहा दिवस सुरु असलेल्‍या अंडर-१६ २० षटकांच्‍या स्‍पर्धेत एकूण सहा संघानी सहभाग घेतला होता. दिल्‍ली, चेन्‍नई, केरळ, सांगली, सिंधुदुर्ग आणि गोवा प्रोफेशनल या संघात सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर आपला खेळ दाखविला. या सहा संघात गेले सहा दिवस ही स्‍पर्धा सुरु आहे. या स्‍पर्धेत रांची (तामिळनाडू) क्रिकेट ॲकॅडमीचे कोच विनोदकुमार यांनी आपला चेन्‍नईचा संघ उतरविला होता. गोव्‍याचे एनआयएस कोच मंदार कदम यांनी आपले संघ या मैदानात खेळविले. 

या स्‍पर्धेला इंटरनॅशनल फुटबॉल खेळाडू जुबीना फर्नांडीस यांनी भेट देत खेळाडूंचे तसेच आयोजकांचे कौतुक केले. तसेच शनिवारी चेन्‍नई विरुध्‍द गोवा यांच्‍यात पार पडलेल्‍या सेमी फायनल सामन्‍याचे हरियानाच्‍या रणजी खेळाडू श्‍वेता शर्मा यांच्‍या हस्‍ते उद्‍घाटन करण्‍यात आले. तसेच दिल्‍ली येथील रणजी खेळाडू कविता शर्मा यांनीही या स्‍पर्धेला भेट दिली. 

महत्‍वाचे म्‍हणजे गोवा संघात दोन महिला खेळाडूंनी सहभाग घेत आपला संघ सेमीफायनलपर्यंत पोहचविला होता. गोव्‍याच्‍या खेळाडू विधी भंडारी आणि आर्या आजगावकर या उत्‍कृष्‍ट गोलंदाज म्‍हणून म्‍हणून गोव्‍याच्‍या संघासाठी योगदान दिले. त्‍यांचे सावंतवाडीतील क्रिकेट रसिकांकडून कौतुक करण्‍यात आले.