गोवा - सिंधुदुर्ग डंपरचालक वाद पेटला..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 06, 2024 06:57 AM
views 1569  views

सावंतवाडी : मालवण येथे काल डंपरने वृद्धाला चिरडल्याने संतप्त झालेल्या जमावाने गोव्यातील डंपर चालकाला मारहाण केल्याचे पडसाद काल रात्री गोव्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गोव्यातील डंपर व मच्छी व्यावसायिक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात येणाऱ्या व गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणाऱ्या सर्व गाड्या काल सायंकाळी उशिरा सीमेवर रोखून धरल्या जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत या गाड्या न सोडण्याचा ईशारा गोव्यातील व्यवसायिकानी दिला. रात्री उशिरापर्यंत याबाबत चर्चा सुरु होती.

गाड्या अडविण्यात आल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दुतर्फा  वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेडणे (गोवा) पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मालवण मध्ये जमावाने कायदा हातात घेऊन चालकाला मारहाण केली, मात्र आपण कायदा हातात घेणार नसून केवळ गाड्या रोखून आंदोलन करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.

काल मालवण देऊळवाडा येथे डंपरने चिरडल्याने वृद्धाचा मृत्यू झाला होता. यामुळे जमावाने संतप्त होत डंपर चालकाला मारहाण केली होती. तसेच गोव्यातील डंपर अडवून ठेवले होते. ही घटना काल सायंकाळी घडली होती.मालवण येथून गोव्यात दररोज माशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. डंपर चालकाला मारहाण झाल्याच्या घटनेचे पडसाद आज गोव्यात उमटले. गोव्यातील डंपर व्यवसायिकानी काल सायंकाळी सर्व गाड्या रोखून धरल्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात जाणाऱ्या माशांची वाहतूक करणाऱ्या गाड्या तसेच डंपर देखील सीमेवर अडवून ठेवण्यात आले. यामध्ये गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात माशांच्या रिकाम्या गाड्या देखील सीमेवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. यावेळी गोव्यातील शेकडो डंपर व्यावसायिक महामार्गावर ठाण मांडून होते.