
सावंतवाडी : ऐतिहासिक राजवाड्यात आयोजित करण्यात आलेल्या दशावतार लोककला महोत्सवाचं उद्घाटन राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले. ८ जानेवारी पर्यंत दशावतार नाट्यप्रयोग या ठिकाणी होणार असून युवराज लखमराजे भोंसले यांच्या पुढाकारातून श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांनी या लोककला महोत्सव २०२३ च आयोजन केलं आहे.
श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलनान या लोककला महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. राजेसाहेब खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला. यावेळी मनोगत व्यक्त करताना युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, लोककला दशावताराचा कार्यक्रम करण्याची इच्छा खुप दिवसांपासुन होती. आज हा योग आला. भविष्यात देखील लोककला महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. राजघराण्याकडून खेमसावंत महाराज, रघुनाथ महाराज, श्रीराम महाराज यांनी ह्या कलेला व्यासपीठ दिले होते. पुढे हा वारसा बापुसाहेब महाराजांनी चालवला होता. ही परंपरा आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. दशावतारासह इतरही लोककलावंत व लोककलेला व्यासपीठ देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे असं मत व्यक्त केले.
दरम्यान, राजेसाहेब खेमसावंत म्हणाले, दुसऱ्या खेमसावंतांनी हे शहर वसवलं होत. त्या काळात अनेक लोक सावंतवाडीत यायचे. त्याकाळात कलाकारांच्या कलेचा सन्मान राजघराण्यान केला होता.
तदनंतर तिसरे खेमसावंत 'राजश्री' यांनी कलावंत व कलाकारांना खऱ्या अर्थानं राजाश्रय दिला. आजही त्यातील अनेक कलावंत व त्यांच्या कला सावंतवाडीत पहायला मिळतात. त्यातीलच एक कला म्हणजे दशावतार आहे. गावातील जत्रांमध्ये ही कला आपणास पहायला मिळते. हि कला व कलावंतांना जिवंत ठेवण्यासाठी महाविद्यालय व राजघराण्याकडून हा प्रयत्न करण्यात आला आहे. इतरही कलांना व्यासपीठ देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांना पुन्हा राजाश्रय दिला जाणार आहे. दशावतार या एका कलेच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली आहे. भविष्यात इतर कलांच एक केंद्र होण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे असं मत व्यक्त केले. यावेळी राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, प्रमुख अतिथी अजय दोडीया, जयश्री दोडीया, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, दशावतार चालक-मालक संघाचे देवेंद्र नाईक, नाथा नालंग, बाबली मेस्त्री, अनिल पटेल, नकुल पार्सेकर आदी उपस्थित होते. आभार प्राचार्य दिलीप भारमल यांनी व्यक्त केले.