नारायण राणेंना ९० टक्के पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून द्या : दिपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 25, 2024 14:12 PM
views 179  views

सावंतवाडी : रस्ते, पाणी, वीज पुरवठा झाला तरी गावात आर्थिक प्रगती झाली पाहिजे. जिल्हा, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ९० टक्के पेक्षा जास्त मताधिक्य मिळवून द्या असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी केले. भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत केसरी येथे दशक्रोशीतील पदाधिकाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपचे मंडळ अध्यक्ष रवींद्र मडगावकर, विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई,उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत, महिला जिल्हाध्यक्षा अँड निता सावंत कविटकर, दिनेश गावडे, विनायक दळवी, रूपेश पावसकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, गुंड जाधव, हनुमंत सावंत, संदेश गुरव व मान्यवर उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश कणखर बनविला. शेजारील राष्ट्र भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत दाखवू शकत नाही. देशाचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सारे काही पंतप्रधान यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंहाचा वाटा आहे. देशाची प्रगती हा आपला स्वाभिमान आहे. उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मोठे कर्तुत्व आहे. त्यांच्या कामगिरी बाबतीत पंतप्रधान, राष्ट्रपती यांनी कौतुक केले आहे. जिल्हा, देशाच्या विकासासाठी नारायण राणे यांना मोठ्या मताधिकाने विजयी केले पाहिजे. सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिंधुरत्न योजनेतून ग्रामीण कृषी पर्यटन, कुक्कुटपालन, शेळीपालन,गोपालन अशा विविध योजनांची अंमलबजावणी होत आहे. काजू बी ला प्रतिकीलो हमीभाव मिळावा म्हणून प्रयत्न केले. आंबोली कबुलायतदार गावकर जमीन वाटप निर्णय झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. स्वाभिमान हा सावंतवाडीचा केंद्र बिंदू आहे. आपली संस्कृती विकासाची आहे. त्यामुळेच गावातील वाद विकासाच्या आड येऊ नये याची काळजी घ्या.


तर भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणाची चांगली सेवा करत आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार निष्क्रिय आहेत. राणे यांना मतदान करण्याची आपणास प्रथमच संधी मिळाली आहे. या मतदारसंघातून जिल्ह्यात मोठे मताधिक्य मिळाले आणि विजयी झाले तर पुन्हा केंद्रीय मंत्री होतील. खासदार विनायक राऊत यांचा विकास निधी दहा वर्षांत किती गावात पोहचला. आपल्यातील मतभेद दूर करून यापुढेही प्रत्येक निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी पुढाकार घेऊयात. गोरगरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबविल्या आहेत. त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा. यावेळी अशोक दळवी, महिला जिल्हाध्यक्षा अँड निता सावंत कविटकर, राघोजी सावंत,दिनेश गावडे आदींनी विचार मांडले.