बांदा तपासणी नाका येथे भूमिपुत्रांना नोकरी द्या!

उपसरपंच खतिब यांची आ. नितेश राणे यांच्याकडे मागणी
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 05, 2023 18:49 PM
views 204  views

बांदा : महाराष्ट्र - गोवा सीमेवर बांदा सटमठवाडी येथे आरटीओ विभागाने विभारलेला अत्याधुनिक सीमा तपासणी नाका लवकरच सुरु होण्याच्या मार्गावर असून याठिकाणी कवडीमोलाने जमिनी दिलेल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत सामावून घ्यावे, यासाठी आपण ठेकेदार कंपनीशी बोलून कार्यवाही करण्यास भाग पाडावे, अशी लेखी मागणी उपसरपंच जावेद खतीब यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली आहे. खतीब यांनी सरपंच प्रियांका नाईक व नवनिर्वाचित सदस्य यांच्यासह आमदार राणे यांची कणकवली येथे भेट घेत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, सीमा तपासणी नाक्यासाठी शासनाने ३२ एकर क्षेत्र संपादित केले आहे. भूमिपुत्रांनी नारळ, सुपारी, काजू, आंबा, कोकम बागायतीसह भातशेती क्षेत्र या प्रकल्पसाठी दिले आहे. बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मोबदला देखील मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार ठेकेदार कंपनीचा येथे भरण्यात येणार नोकर वर्ग हा बाहेरून आणण्याचा खटाटोप सुरु आहे. स्थानिकांना केवळ रोजंदारीवर सामावून घेण्यात येणार असल्याने आमचा यासाठी प्रखर विरोध आहे. बांदा गावात व परिसरात उच्च शिक्षित अनेक युवक - युवती बेरोजगार आहेत.

   या युवकांना कार्यालयीन सेवेत सामावून घ्यावे, यासाठी आपण स्वतः वयक्तिक लक्ष देऊन ठेकेदार कंपनीशी चर्चा करावी. आमदार राणे यांनी आपली मागणी रास्त असून आपण निश्चितच यासंदर्भात ठेकेदार कंपनीशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

   यावेळी सरपंच प्रियांका नाईक, सदस्य आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, श्यामसुंदर मांजरेकर, सिद्धेश महाजन, सदस्या रुपाली शिरसाट, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार राणे यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्यात.