
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे कदमवाडी येथील, शोषित व पीडित मुलांकरिता चालविण्यात येणाऱ्या, नाग्या महादू निवासी वसतिगृह येथे, श्रीम. मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई, या संस्थानमार्फत, वसतीगृहास लागणाऱ्या,गोदरेज कपाट, इलेक्ट्रिक शेगडी, नेब्युलायझर, पाणी गरम करायची कीटली, स्वयंपाकघरास लागणारी विविध प्रकारची भांडी, मुलांकरिता कपडे,अशा विविध वस्तू देण्याचा कार्यक्रम कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी वसतीगृहातील मुलांनी प्रार्थना व समूह गायन करून पाहुण्यांचे स्वागत केले.
संस्थाचालक उदय अहिर यांनी संस्था चालविताना येणाऱ्या अडचणी व शासनातर्फे मुलांचे विविध दाखले मिळविण्याकरिता प्रशासनाचे असहकार्याचे धोरण याबाबत आपल्या व्यथा मांडल्या. संस्था उभी करण्याकरिता ज्यानी ज्यानी मदत केली त्यांचेही आभार अहिर यांनी मानले. चौधरी यांचे सहकार्याने अमोल नारिंग्रेकर यांनी आपल्या वडिलांचे स्मरणार्थ गोदरेज कपाट दिले आहे, त्यांचेही आभार अहिर यांनी व्यक्त केले.
तहसीलदार कुडाळ यांनी, क्रीडा क्षेत्रात व शिक्षण क्षेत्रात अस प्राविण्य मिळवा की या वसतीगृहाचा डंका महाराष्ट्रासह देशामध्ये वाजला पाहिजे, जेणेकरून आपल्या जिल्ह्याचे नाव देशाच्या पटलावर प्रामुख्याने कोरल जाईल. भविष्यात उद्भभवणाऱ्या शासकीय अडचणी दूर करण्याची हमी तहसीलदार यांनी दिली.
संस्थाचालक चौधरी यांनी, आपल्या भाषाणात जिल्ह्यातील अशा मुलांना एकत्र करून हे वसतिगृह उदय आहीर चालवीत आहेत, अनेक अडचणींवर मात करीत हे कार्य उदय आहीर व त्यांची पत्नी यशस्वीपणे पार पाडत आहेत, याबद्दल त्यांचे कौतुक केले, व भविष्यातही अशाच प्रकारे मदतीचा ओघ आपल्या संस्थेकडे चालू ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर हे स्वतः पाट विद्यालयात शिक्षक असल्याने, त्यांनी शैक्षणिक दृष्ट्या कशी प्रगती करावी याबाबत मुलांना मार्गदर्शन केले. उदय अहिर यांनी पाहुण्यांचे आभार मानले व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.










