
दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्यावरील घोटगेवाडी येथे कोसळलेल्या पाईपलाईनची आठ दिवसात दुरुस्ती करून घोटगे परमे गावातील शेती बागायतींना सुरळीत पाणीपुरवठा करून देण्याचे लेखी आश्वासन सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता व्ही. बी. जाधव यांनी दिल्यानंतर रविवारी सायंकाळी उपोषण तात्काळ मागे घेण्यात आले. या मागणी बरोबर आणखी चार मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. वरील मागण्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा घोटगे सरपंच भक्ती दळवी व घोटगे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल दळवी, भरत दळवी , डॉक्टर मोहन दळवी, शिवसेना विभाग प्रमुख विनय दळवी, उपसरपंच विजय दळवी , ग्रा. सदस्य समीक्षा दळवी, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर दळवी, सतीश परब, महेश दळवी, कानू दळवी, संदीप नाईक, प्रेमानंद दळवी, उपविभागीय अभियंता किरण मेहत्रे, कनिष्ठ अभियंता उत्तम तुरंबेकर, ग्रा. सदस्य अजय दळवी, स्वप्निल दळवी, विद्यानंद दळवी ,शंकर गवस, श्रीराम दळवी , मुकुंद परब घोटगेवाडी ग्रामस्थ शेतकरी आदी उपस्थित होते.
तिलारी उजवा तीर कालवातील जलवाहिनी कोसळल्यामुळे घोटगे परमे गावातील शेतकऱ्यांच्या बागायतीचा प्रश्न निर्माण झाला. एन वेळेतच पाईपलाईन कोसळल्यामुळे घोटगे, परमे, घोटगेवाडी शेतकरी 26 जानेवारी रोजी आमरण उपोषणाला बसले होते. यावेळी कार्यकारी अभियंता व्ही. बी जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याच्या लेखी आश्वासन दिले. मागण्या पुढील प्रमाणे तिलारी उजवा तीर कालव्यावरील केर नाला येथे कोसळलेल्या पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती आठ दिवसात करण्यात येईल, फुटलेल्या कालव्याला पर्यायी व्यवस्था म्हणून पाईप द्वारे पाणीपुरवठा दिनांक ३० /०१ /२०२५ पर्यंत करण्यात येणार आहे. घोटगे पासून परमे पर्यंतच्या कालव्याच्या भराव काढून वाढलेली झाडे झुडपे काढण्यासाठी दिनांक २८/ ०१ /२०२५ पर्यंत यांत्रिकी विभागा मार्फत मशनरी पुरवण्यात येईल, घोटगे पासून परमे पर्यंतच्या कालव्यामध्ये असलेला गाळ काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येत आहे. ओपन ट्रॅफ अर्क्वेडक्टचे काम करणे बाबत अंदाजपत्रक व मंजुरी करीता पाठपुरवठा करून ओपन ट्रॅफ अक्वेडक्ट चे काम करण्यात येईल. या सर्व मागण्या आठ दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी दिले. आठ दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास कोणतेही कल्पसूचना न देता पुन्हा आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरपंच भक्ती दळवी व शेतकऱ्यांनी दिला आहे.
कार्यकारी अभियंता शेतकऱ्यांवर भडकले
दरम्यान, उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता विनायक जाधव यानां जाब विचारला असता जाधव जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यांवर भडकले. आम्ही मूर्ख नाही मूर्ख तुम्ही आहात असे बोलता क्षणी शेतकऱ्यांनी जाधव यांना फैलावर घेतले. बोलताना संभाळून बोला आमचा अंत पाहून नको काम जमत नसेल तर प्रकल्प बंद करा काहीही गरज नाही असे शेतकऱ्यांनी जाधव यांना सुनावले.
२६ जानेवारीला घोटगे, परमे, घोटगेवाडी येथील शेतकऱ्यांनी फुटलेल्या कालव्याच्या पाईपलाईनकडे आमरण उपोषणास सकाळी सुरवात केली होती. यावेळी उपोषणास भेट देण्यास आलेल्या कार्यकारी अभियंता यांना शेतकऱ्यांनी फैलावर घेत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी सर्व शेतकरी व सरपंच भक्ती दळवी यांनी येत्या आठ दिवसात पाईप लाईनचे काम सुरळीत करा व कालव्यातील गाळ तसेच लगतची झाडे साफ करून कालव्याची डागडुजी करा अन्यथा कोणत्याही क्षणी आपल्याला कल्पना नदेता उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.