संशोधक वृत्ती जोपासून राष्ट्र विकासासाठी सज्ज व्हा..! विकास सावंत यांचे आवाहन.

आरपीडीत जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: February 01, 2023 18:36 PM
views 211  views

सावंतवाडी : जिल्हा परिषद शिक्षण विभाग सिंधुदुर्ग व राणी पार्वतीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला बुधवारपासून सुरुवात झाली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख, विविध तालुक्यांचे शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत बुधवारी मोठ्या दिमाखात शहरातील आरपीडी विद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रदर्शनास सुरुवात झाली.

यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विकास सावंत उपस्थित होते. प्रारंभी सर्वांचे स्वागत मुख्याध्यापक जगदीश धोंड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थाध्यक्ष विकास सावंत म्हणाले की, आज विज्ञानाशिवाय जगणे अशक्य आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विज्ञानाने दिलेल्या देणगीद्वारेच जीवन जगतो. हल्ली विज्ञान युग असल्यामुळे प्रत्येकाने विज्ञानाचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संशोधकृती अंगीकारून डॉ. अब्दुल कलाम, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. जगदीश चंद्र बोस यांच्यासारखे महान संशोधक होण्यासाठी सज्ज व्हावे, असाही सल्ला श्री. सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला.
प्रास्ताविक सादर करताना माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुश्ताक शेख म्हणाले की, विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञान प्रयोगशाळा परिचर (सहाय्यक) यांच्या वैज्ञानिक संशोधनाला वाव मिळावा, विशेषत: विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरूनच विज्ञानाची गोडी लागावी, म्हणून सातत्याने शिक्षण विभाग विज्ञान प्रदर्शन, विज्ञान मिळावे आयोजित करीत असून जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यात सहभागी असलेल्या सर्वांचेच अभिनंदन व स्वागत करतो, असे सांगत त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी सौ. मांजरेकर, दूर्वा साळगावकर, मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर,  मुख्याध्यापक दिनेश  म्हाळगूत यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

दरम्यान सकाळच्या सत्रात शिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित निबंध स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी सौ. मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक जगदीश धोंड, सावंतवाडी तालुका शिक्षण विस्तार अधिकारी दूर्वा साळगावकर, मालवण तालुका विस्तार अधिकारी सौ. परब, प्राथमिक गटाचे परीक्षक अंजली बांदेलकर, प्रज्ञा मातोंडकर, माध्यमिक गटाचे परीक्षक प्रमोद सावंत, किशोर वालावलकर उपस्थित होते.
यावेळी निबंध स्पर्धा समितीच्या प्रमुख प्राध्यापिका डॉ. संजना ओटवणेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष पाथरवट यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संजना ओटवणेकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमासाठी प्रा. उज्वला कुबल, प्रा. झेबा बेग आदी उपस्थित होते.

सेल्फी पॉईंट ठरले आकर्षण
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सेल्फी पॉईंट उपस्थितांचे व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या मान्यवरांचे विशेष आकर्षण ठरले आहे. यात विद्यार्थ्यांनी साकारलेले फुलपाखरू आणि त्या फुलपाखरूच्या पंखांवर साकारलेले विविध रेणूसुत्रे, आणि गणितातील मूलभूत सिद्धांत व सूत्रे हे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. अनेकांनी या सेल्फी पॉईंटवर जाऊन आपल्या व मित्रांच्या सेल्फी घेतल्या व विज्ञानाचा एक महाउत्सव जणू साजरा केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.