
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यामधील गेळे कबुलायतदार जमीन प्रश्न सुटावा आणि गेळे ग्रामस्थांना आपल्या हक्काची जमीन मिळावी यासाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
याप्रसंगी गेळे कबुलायतदार जमीन प्रश्न सुटावा आणि गेळे ग्रामस्थांना आपल्या हक्काची जमीन मिळावी व हा विषय सोडविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा तसेच या विषयाच्या अनुषंगाने शासन स्तरावर असणाऱ्या जुन्या नोंदी तपासून प्रस्ताव तयार करावा असे निर्देश मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे, सावंतवाडी आंबोली मंडळ भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे, आनंद गावडे, विजय गवस, नारायण लाड, तानाजी गावडे, भरत डोंगरे, सावंतवाडी पंचायत समिती सदस्य यांच्यासह महसूल व वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.