बागायतीत गव्यारेड्यांचा धुडगूस

Edited by: विनायक गांवस
Published on: February 19, 2025 11:46 AM
views 81  views

सावंतवाडी : मळगाव रेडकरवाडी येथे गवळ्यांच्या मोठ्या कळपाने काजू बागायतीत अक्षरशः धुडगुस घातला. मोहरलेली शेकडो काजू झाडे अक्षरश: मुळापासून उखडून टाकली. त्याचबरोबर नाचणी चवळी वाली व अन्य भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पहाटे सहा वाजेपर्यंत गव्यांचा हा धुडगुस सुरूच होता. अगदी घरालगत हा प्रकार घडत असल्यामुळे शेतकरी कमालीचे घाबरले होते. 

रात्री १ च्या सुमारास विनायक राणे या शेतकऱ्याने अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क साधत या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर वनविभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले मात्र त्यांच्याकडे गव्यांना उस्कावण्यासाठी कोणतीही साधनसामुग्री नसल्याने त्यांना रिक्त असते परतावे लागले. या प्रकाराबाबत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. नेमळे येथे गुरे चारत असलेल्या एका शेतकऱ्यावर गव्यांनी हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर अगदी घरालगत येऊन गव्यांनी अक्षरशः धुडगूस घातल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. परसबागेसाठी शेतकऱ्यांनी घातलेली कुंपणे देखील गव्यांनी उध्वस्त केली आहेत. या घटनेत दिवाकर खानोलकर, दिनेश खानोलकर, गोविंद कोचरेकर, मंगेश कोचरेकर, बाबुराव कोचरेकर यांच्या काजू बागायतीचे तर विनायक राणे व नारायण राऊळ यांच्या भाजीपाल्याचे गव्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. यात दिवाकर खानोलकर यांची १६ काजू कलमे व दोन नारळ रोपे, बाबुराव कोचरेकर यांची १७ काजू कलमे तसेच प्रदीप राणे व नारायण राऊळ यांची नाचणी तसेच मका, चवळी, वाल व अन्य भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तर विजय हरमलकर तसेच महेश पंतवालालकर यांच्या भात शेतीचे व परसबागेचे व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.  या घटनेत शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असल्यामुळे याबाबत वनविभागाने त्वरित योग्य ती कार्यवाही करावी व गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा तसेच शेतकऱ्यांची झालेली नुकसान भरपाई त्वरित पंचनामे करून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

दरम्यान, वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक सुनील गडदे, वनसेवक गोपाळ सावंत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी शेतकरी दिवाकर खानोलकर, अर्चना खानोलकर, लवू कोचरेकर, नारायण राऊळ, महेश पंतवालावलकर, विजय हरमलकर, प्रदीप राणे, नूतन राऊळ, दयानंद मातोंडकर आदी उपस्थित होते.