सोनं पावली गौराई आली !

Edited by: विनायक गावस
Published on: September 21, 2023 18:40 PM
views 122  views

सावंतवाडी : माहेरवाशिणींच्या  गौराईच गुरुवारी घरोघरी आगमन झालं. वाजत-गाजत पारंपरिक पद्धतीने गौरी घरोघरी विराजमान झाली. महिलांकडून मोठ्या हौसेनं गौरीला सजवल जाणार असून शुक्रवारी घरोघरी तिची पूजा केली जाणार आहे. पहिल्या दिवशी भाजी-भाकरीचा नैवद्य गौराईला दाखवण्यात येणार आहे.

गौरी-गणपतीच्या सणाला कोकणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाविकांना जितका लळा बाप्पाचा असतो तेवढाच महिला वर्गांला गौरी आगमनाचा  असतो. भाद्रपद चतुर्थीला लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर घराघरातील सासुरवाशिणींना गौरीच्या आगमनाचे वेध लागतात. या लाडक्या गौराईचे गुरुवारी सर्वत्र उत्साहात आगमन झालं. काही ठिकाणी सुवासिनींनी खडयाची, काही ठिकाणी पानांची तर काही ठिकाणी गौरीचे मुखवटे आणून त्यांची पूजा केली जाते. गौरी आणण्यासाठी पाणवठयावरही मोठी लगबग असते. ठिकठिकाणच्या विहिरी, नद्या तसेच पाणवठयावर सुवासिनी आणि मुलींनी गर्दी केली होती.

भरजरी साडया नेसून आलेल्या सुवासिनींपासून ते मुलींपर्यंतचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. गौरी घरी आणाल्यानंतर त्यांची हळद- कुंकू, दुर्वा, फुलं, गिजवस्त्र यांनी पूजा केली गेली. वाजत-गाजत गौरीचे डहाळे घेऊन आलेल्या माहेरवाशिणींसह मुलींचे औक्षण करून सुवासिनींनी गौरीला विराजमान केले. उद्या शुक्रवारी पुजा असल्यानं महिलांची लगबग वाढली आहे. कोकणात झिम्मा फुगडी घालून गौरी जागवण्याची पद्धत असून घरोघरी महिला एकत्र येऊन झिम्मा फुगडीचा फेर धरत गौरी जागवणार आहेत. नवविवाहितांची मंगळागौर साजरी केली जाणार आहे. उद्या पुजेनंतर पूजा गोडाचा किंवा तिखटाचा नैवेद्य दाखवला जाणार आहे. कोकणात काही ठिकाणी गौराईला तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो. दरम्यान, शनीवारी पाच दिवसांच्या श्रीगणेशासोबत गौरींचेही विसर्जन केले जाणार आहे. गौरी-गणपतीच्या या सणाचा उत्साह शहरासह गावागावांत पहायला मिळत आहे.