गार्गी सावंतला माजी सैनिक कल्याणचा विशेष गौरव पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित
Edited by: विनायक गांवस
Published on: December 11, 2025 14:35 PM
views 83  views

सावंतवाडी :  शांतीनिकेतन इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेली कोलगाव येथील कु.गार्गी किरण सावंत हिला माजी सैनिक कल्याण कार्यालयतर्फे देण्यात येणारा २०२५-२६ चा विशेष गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते गार्गीला देण्यात आला. रु.२५,००० रोख रक्कम, प्रमाणपत्र, शाल आणि श्रीफळ देऊन गार्गीच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.

                

 विशेष म्हणजे गार्गीने वयाच्या ११ व्या वर्षीच भारतीय संगीत कलापीठाची पखवाज विशारद ही पदवी प्राप्त करून सिंधुदुर्गातील सर्वात लहान महिला पखवाज विशारद म्हणून इतिहास रचला आहे. तिच्या या यशामागे शाळेचे शिक्षक, आई-वडील तसेच आजी-आजोबांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद महत्त्वाचे ठरले आहेत. गार्गीला तिचे गुरु पखवाज अलंकार महेश विठ्ठल सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणामुळे गार्गीने अल्पवयातच पखवाज वादनात प्रावीण्य मिळवले.

 याचबरोबर गार्गी ही राष्ट्रीय गुणांकनप्राप्त बुद्धिबळ खेळाडू आहे. सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुदधिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली गार्गीने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवली आहेत.

संगीत आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात तिने केलेली कामगिरी तिच्या बहुआयामी प्रतिभेचे द्योतक ठरते. या यशामुळे गार्गीचे नाव जिल्ह्याच्या सांस्कृतिक व क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. गार्गीच्या या यशाबद्दल संगीत जगन्नाथ विद्यालय, शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार यांनी भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.