सावंतवाडी : मळगाव येथील ‘माळीचे घर’ याला सुमारे सातशे वर्षांहूनही अधिक काळ असलेला गणेशोत्सव राऊळ कुटुंबांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. सुमारे ८० कुटुंबांच्या माध्यमातून हा सण साजरा केला जातो.
सोनुर्लीतील श्री देवी माऊलीसह मळगाव येथील श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ, श्री देव मायापूर्वचारी, श्री देव दोन पूर्वस या चार देवस्थानांसह गावातील पाचवे देवस्थान म्हणून ओळख असणारे माळीचे घर श्री गणेशाच्या सातशे वर्षांच्या परंपरेमुळे मळगावसह तालुक्याचे धार्मिक भूषण म्हणून नावारूपास आले आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील माळीचे घरातील गणेशोत्सवाची परंपरा कोकणच्या संस्कृतीचीच प्रचिती आणून देणारी आहे. सुमारे सातशे वर्षांहूनही अधिक काळ माळीच्या घरात गणेशोत्सव ८० कुटुंबांच्या सामूहिकतेतून हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या कुटुंबीयांकडून करण्यात येणारी गणेशोत्सवाची पूर्वतयारी, गणेशाच्या कालावधीतील भक्तीमय कार्यक्रम हे प्राचीन भारतीय संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीच्या उत्तम उदाहरणाचा दाखला देणारी आहे.
रेल्वे स्थानकामुळे देशाच्या नकाशावर रेखाटले मळगाव या गावात दहा वाड्यांचा समावेश असून लोकसंख्या सुमारे सहा हजारांच्या आसपास आहे. गावाच्या उत्तर दिशेला माळीचे घर वसले असून या परिसरात राऊळ कुटुंबांची जवळपास सहाशेच्या आसपास लोकवस्ती आहे. या कुटुंबीयांमधील प्रत्येक घरातील किमान निम्मे तरी कामानिमित्त पुणे-मुंबई येथे स्थायिक झालेत. वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त विभागलेली ही भावंडे होळी पौर्णिमा, नागपंचमी, अष्टमी आणि गणेशोत्सव अशा चार उत्सवाला एकत्र येतात. या तिन्ही उत्सवांमध्ये महत्त्वाच्या असणाऱ्या गणेशोत्सवाची पूर्वतयारी या तिन्ही उत्सवातील भेटीमध्ये राऊळ बांधवांकडून होत असते. त्यामुळे गणेशाच्या तयारीसाठी आवश्यक सर्व गोष्टींची कसलीही घाई, गडबड वा गोंधळ न करता अगदी नियोजनबद्धरीत्या तयारी केली जाते. गणेशाेत्सव सण राऊळ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली घरातील लहान-मोठी मंडळी सहभागी होऊन अगदी पारंपरिक पद्धतीने केला जातो. माळीच्या घरातील गणेशोत्सव हा पारंपरिक सात दिवसांचा असतो. पहिल्या दिवशी म्हणजेच मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी गणेशाचे विधिवत पूजन झाल्यावर गणेशाला या कुटुंबीयांकडून वेगवेगळ्या सात प्रकारचा नैवेद्य दाखविला जातो. यातूनच सामूहिक भोजनाचा आनंदही लुटला जातो. शिवाय या घरातील प्रत्येक कुटुंबियांकडून गणेशाला आपल्या आवडीचाही नेवैद्य दाखविला जातो. उत्सवाच्या सात दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेतल्या जातात. घरातील सर्व कुटुंबातील महिला एकत्र येत रोज गणपतीसमोर विविध प्रकारच्या फुगड्या घालतात. याशिवाय रोज सायंकाळी आरतीनंतर भजन व शेवटच्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे सातही दिवस संपूर्ण घरात भक्तिमय वातावरण पसरलेले असते. सातही दिवस या घरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांत ज्येष्ठ, तरुण मंडळींसह घरातील लहान मुलेही आनंदाने सहभागी होतात. सातव्या दिवशी चोवीस जणांच्या आधाराने श्रींचे भक्तिमय वातावरणात ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन केले जाते.
गणेशोत्सवाच्या अगोदर येणाऱ्या पौर्णिमेला मूर्ती तयार करण्यासाठी माती आणली जाते. चतुर्थीपूर्वीच्या आठवड्यात मूर्ती साकारण्यास सुरुवात केली जाते. ही मूर्ती राऊळ बांधवांतील ज्येष्ठ मंडळी आजही आपल्या हाताने तयार करतात. मूर्ती बनविताना या कुटुंबातील तरुण मंडळी तसेच लहान मुलेही हातभार लावतात. मळगाव गावातील मानाचा गणपती म्हणून नावारूपास आलेल्या गणपतीला राऊळ कुटुंबीयांकडून सात प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात आणि या नेवैद्यातूनच सामूहिक भोजनाचा आनंद हे बांधव लुटतात. त्यामुळे माळीच्या घराचा वारसा कायम एकोप्याने जोपासला आहे.